शिरूर तालुक्यात वडगाव रासाई येथे भरदिवसा सोनं हिसकावून चोरी

क्राईम शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील किराणा दुकानात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. किराणा दुकान चालवणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ₹1,58,400 किंमतीचं सोन्याचं मिनी गंठण दोन अज्ञात इसमांनी जबरदस्तीने हिसकावून लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. ४ जून) दुपारी सुमारास घडली.या प्रकरणी सुरेखा अनिल कुंभार (वय ४६, व्यवसाय – किराणा दुकान, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की,सुरेखा कुंभार यांचे वडगाव रासाई गावातील “शांभवी किराणा दुकान” या ठिकाणी दुपारी सुमारास (०४.०८ वाजता) दोन अज्ञात इसम ग्राहक म्हणून आले. त्यातील एकाने पाण्याच्या बाटलीसाठी विचारणा करत ग्राहक असल्याचे भासवले. मात्र काही क्षणातच त्या इसमांनी सौ. कुंभार यांच्या गळ्यातील १ तोळा ८ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण जबरदस्तीने ओढून चोरले आणि घटनास्थळावरून फरार झाले.या घटनेनंतर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पो.स.ई. नकाते करत आहे.

शिरूर बस स्थानकावर चार दिवसापूर्वी होमगार्ड चंदाबाई यांच्याही गळ्यातील दागिने बसस्थानकावरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. जर होमगार्ड सुरक्षित नाही तर बाकी प्रवाशांचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. दोन्ही घटनांमधील अज्ञात आरोपींचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. दुकानात, बसस्थानकातील असलेले सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शिरूर पोलिसांची शोधमोहीम वेगाने सुरू आहे.या संदर्भात नागरिकांनी कोणतीही संशयास्पद व्यक्ती, हालचाल किंवा माहिती आढळल्यास शिरूर पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.