मी मोठा झाल्यावर शिरूरचा आमदार होणार; चिमुकल्या शौर्यचा संकल्प

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): स्वप्नांना वयाचे बंधन नसते, हे दाखवून देणारा भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंग शिरूर तालुक्यातील सातकरवाडी येथे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पाहायला मिळाला. जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या शौर्य रवींद्र टेमगिरे याने भविष्यात शिरूर तालुक्याचा आमदार होऊन आपल्या गावासह संपूर्ण तालुक्यासाठी मोठे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात शौर्यने आपल्या निरागस शब्दांत मोठे स्वप्न व्यक्त केले. “मी अजून लहान आहे. मला स्वातंत्र्य म्हणजे काय, हे समजत नाही; पण मोठा झाल्यावर शिरूरचा आमदार होऊन गावासाठी आणि तालुक्यासाठी मोठे काम करणार,” असे त्याने सांगितले.

शौर्यच्या या निरागस संकल्पाने उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्याच्या आत्मविश्वासाचे आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेचे उपस्थितांनी कौतुक केले. लहान वयातच मोठे ध्येय उराशी बाळगणाऱ्या शौर्यला यावेळी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मार्गदर्शक शिक्षक पोपट रासकर, मुख्याध्यापिका संगिता वाघ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनय सातकर, शिवसेनेचे एकनिष्ठ ऋषिकेश टेमगिरे, विवेक सातकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कोकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी चिमुकल्या शौर्यच्या ध्येयाचे कौतुक केले.

आज शौर्यला स्वातंत्र्याचा अर्थ कदाचित पूर्णपणे समजत नसेल; मात्र मोठे होऊन गाव, तालुका आणि समाजासाठी काम करण्याचे त्याचे स्वप्न निश्चितच प्रेरणादायी आहे. चिमुकल्या शौर्यच्या या संकल्पाने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत