शिरुर (तेजस फडके) सध्या सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. ग्रामीण भागात शेतीत राबण्यापासुन आय टी क्षेत्रातही महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करतात. तसेच राजकारणात सुद्धा अनेक महिला स्वकर्तृत्वावर पुढे आल्या आहेत. अनेकवेळा एखादी महिला राजकीय पदावर असते. परंतु सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची वेळ आल्यावर मात्र त्या महिलेचे पतीचं ‘आपल्या कारभारणीच्या नथीतुन तीर मारत’ स्वतःच पदाधिकारी असल्यासारखे मनोगत व्यक्त करतात.
परंतु शिरुर तालुक्यात मात्र सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात स्वकर्तृत्वावर पुढे आलेल्या अनेक महिला सार्वजनिक ठिकाणी भाषणबाजी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे लग्न समारंभ, वाढदिवस, दशक्रिया विधी तसेच इतर अनेक समारंभात पुरुषांच्या बरोबरीने महिलासुद्धा श्रद्धांजली व शुभेच्छा देत असतात. त्यामुळे महिलाही सगळ्याच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने सहभागी होताना दिसत आहेत. असाच एक आगळावेगळा विवाहसोहळा नुकताच शिरुर तालुक्यात पार पडला जिथं पुरुषांपेक्षा महिलांच्या भाषणांनीच व्यासपीठ गाजल.
रविवार (दि ३०) जुन २०२४ रोजी करडे येथील भैरवनाथ लॉन्स या ठिकाणी गुनाट येथील डॉ जयराम भगत यांची कन्या धनश्री तसेच कडूस (ता. श्रीगोंदा) येथील बबन रावडे यांचे चिरंजीव महेश यांचा शुभविवाह संपन्न झाला. अनेक ठिकाणी विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पुरुष मंडळीच शुभाशिर्वाद देत असतात. परंतु भगत आणि रावडे कुटुंबियांनी एक वेगळा पायंडा पाडत फक्त सामाजिक व राजकीय क्षेत्रातील महिलांनाच शुभशिर्वाद देण्याची संधी दिली.
या विवाह सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर फक्त महिलांनीच शुभाशिर्वाद दिले. यामध्ये कृषि व पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती मनिषा कोरेकर, मुखईच्या सरपंच संयोजिता पलांडे, निमोणेच्या माजी सरपंच जिजाबाई दुर्गे, मांडवगण फराटाच्या माजी सरपंच सिमा फराटे, तर्डोबाची वाडीच्या माजी सरपंच वर्षा गायकवाड या सर्व महिलांनी शुभेच्छा दिल्यानंतर हा विवाहसोहळा संपन्न झाला. या विवाहाचे निवेदन माउली भगत व जयवंत भगत यांनी केले.
भगत व रावडे कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव…
सध्या अनेक दशक्रिया विधी किंवा लग्न सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील पुरुष मंडळी श्रद्धांजली तसेच शुभेच्छा देत असतात. परंतु बऱ्याचवेळा आपण नेमक कोणत्या कार्यक्रमासाठी आलोय याचं या मंडळींना भान राहत नाही आणि मग मुळं विषयाला बगल देत यांची भाषणाची गाडी रुळावरुन घसरते. त्यामुळे अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी त्यांची फजिती होते. परंतु याउलट बऱ्याचवेळा महिला मात्र मुद्देसुद आणि मोजकच बोलतात. त्यामुळे शुभविवाहाच्या निमित्ताने महिलांना शुभाशिर्वादाची संधी देत एक आगळावेगळा पायंडा पाडल्याबद्दल भगत आणि रावडे कुटुंबावर आलेल्या सर्वच पाहुणे मंडळीनी कौतुकाचा वर्षाव केला.
शिरुरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई, मलठण परिसरात एका रात्रीत फोडली पाच घरे
शिरुर तालुक्यात विद्युत रोहीत्रांच्या चोऱ्या थांबेना, शेतकरी हतबल;पोलिसांपुढे मोठे आव्हान
शिरुरच्या बेट भागात टाकळी हाजी येथे दुध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; शिवबा संघटनेचा आक्रमक पवित्रा