शिवनेरी ते वढु बुद्रुक स्वतंत्र मार्गाचा मुख्यमंत्र्यांचा विचार

महाराष्ट्र शिरूर तालुका

वढू बुद्रुकच्या ग्रामस्थांना दिली वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्वाही

शिक्रापूर (शेरखान शेख): वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या शिष्ठमंडळाने नुकतेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी ते छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ वढु बुद्रुक हा संपूर्ण मार्ग राज्यभरातील शिवभक्त व शंभूभक्तांसाठीचा स्वतंत्र बनविण्यासाठी आपण विचार करु आणि लवकरच त्याबाबत वाच्यता करु तसेच वढु बुद्रुक येथे २१ मार्च रोजी येण्याबाबत लवकरच कळविण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराज विकास आराखडा ३९७ कोटींचा मंजुर केल्यानंतर त्यांचे जाहीर आभार मानन्यासाठी वढु बुद्रुकचे उपसरपंच राहूल कुंभार, माजी सरपंच अंकुश शिवले, माजी उपसरपंच संतोष शिवले, ग्रामपंचायत सदस्य माऊली भंडारे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्यावर येताच त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे दूत असल्याचे म्हणत वढु बुद्रुकच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत वढु बुद्रुक, वढु खुर्द, कोरेगाव भिमा, परिसरातील गावांची माहिती घेतली.

यावेळी वढु ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी ते छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ हा स्वतंत्र मार्ग विकसित करण्याची तसेच या संपूर्ण मार्गासाठी स्वतंत्र निधी तरतूद करण्याची मागणी केली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आपण लवकरच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून ठोस निर्णय जाहीर करु असे सांगितले. तर २१ मार्च २०२३ रोजी धर्मवीर संभाजी महाराजांची ३३४ वी पुण्यतिथी असून त्यादिवशी येथे शासकीय मानवंदना दिली जाते.

सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले. मात्र सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्यातून कसा वेळ काढता येईल ते पाहतो व लवकरच येण्यासाठीची तजवीजमाजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामार्फत आपल्याला कळवितो असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले असल्याचे माजी सरपंच अंकुश शिवले यांनी सांगितले.

शिवभक्त व शंभूभक्तांनी केली अशी अपेक्षा…

शिवजन्मभूमी शिवनेरी, जुन्नर, नारायणगाव ता. जुन्नर व पारगाव, धामणी, लोणी ता. आंबेगाव तसेच पाबळ, केंदूर, चौफुला, वढु बुद्रुक ता. शिरुर असा हा एकसलग सहापदरी रस्ता शंभूभक्त व शिवभक्तांना अपेक्षित असून संपूर्ण मार्ग वढु बुद्रुक ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना अगदी नकाशावर दाखवून दिला असताना याबाबत तात्काळ सर्व्हेक्षण करु, अशीही ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याची माहिती माजी सरपंच अंकुश शिवले यांनी दिली आहे.