शिरूर (अरुणकुमार मोटे): रामनवमीच्या पावन दिवशी शिरूर शहरात समाजसेवा, वैद्यकीय सेवा आणि राजकारण यांमध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे यांच्या सन्मानार्थ नामित ‘डॉ. बाळासाहेब नरवडे मार्गा’च्या फलकाचे नूतनीकरण करण्यात आले. या प्रसंगाने शिरूरच्या सेवाभावी परंपरेला उजाळा देत नव्या पिढीला प्रेरणादायी वारसा पुढे नेण्याची साक्ष पटवली.
शहराच्या सेवाभावी इतिहासाचे अधिष्ठान: डॉ. बाळासाहेब नरवडे हे केवळ एक कुशल दंतचिकित्सक नव्हते, तर गरिबांसाठी नि:स्वार्थी वैद्यकीय सेवा देणारे समाजसेवक होते. त्यांनी “देतात तेवढंच घ्या” या तत्त्वावर उपचार करत, माणुसकीचे व्रत जोपासले. त्यांच्या हवेलीचे रूपांतर एक सामाजिक व राजकीय केंद्रस्थानात झाले होते. इथेच अनेक राजकीय घडामोडी घडल्या, ज्यात माजी मुख्यमंत्री मा. शरद पवार साहेब यांचेही काही काळ वास्तव्य होते.
‘डॉ. नरवडे मार्ग’ — गौरवाचे प्रतीक: सुमारे ३० वर्षांपूर्वी जाकीरखान पठाण, तुकाराम खोले व शरद कालेवार यांच्या पुढाकारातून, डॉ. नरवडे यांचे सुपुत्र गोविंद नरवडे यांच्या अनुमतीने, शहरातील एका रस्त्याला ‘स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे मार्ग’ असे नाव देण्यात आले. या नामकरणाचा भव्य समारंभ तत्कालीन मुख्यमंत्री मा. शरद पवार साहेब यांच्या हस्ते पार पडला होता.
रामनवमीच्या दिवशी डॉ. नरवडे यांचे नातू सागर नरवडे आणि पंतु यशराज नरवडे यांनी पुढाकार घेऊन या रस्त्याच्या फलकाचे नूतनीकरण केले. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले.
या समारंभास तुकाराम खोले, सुनील जाधव, मयुर नाहार, एजाज बागवान, मंगेश खांडरे, योगेश थोरात, शुभम शाहणे, पंकज जाधव, अविनाश घोगरे, परेश काळे, राहुल भोते, किरण काळे, अजित ठोंबरे, अस्लम शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमताने डॉ. नरवडे यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या जीवनमूल्यांचा वारसा जपण्याचे आश्वासन दिले.
नरवडे कुटुंबाचा उज्ज्वल वारसा: “सर्वजण आपलेच” या भावनेने प्रेरित होऊन, नरवडे कुटुंबाने समाजात कधीही भेदभाव न करता कार्य केले. आज त्यांची चौथी पिढी — श्रीहरी, सागर, जयकुमार, दत्ता — हा वारसा पुढे नेत आहे. विशेषतः सागर नरवडे हे शिरूर शहराच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींमध्ये सक्रीय असून, कुटुंबाचा लौकिक वृद्धिंगत करत आहेत. पंतु यशराज व आदित्य ही युवा पिढीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रेरणादायी कार्यात सहभागी आहे. समाजसेवेच्या स्मृतीचे: डॉ. बाळासाहेब नरवडे यांचे जीवन हे शिरूरच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे. त्यांच्या स्मृतीस वंदन करत, त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श घेऊन पुढे वाटचाल करणाऱ्या कुटुंबीयांना समाजातून, राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.