पाचकंदील चौकातील पार्किंगचा प्रश्न गंभीर, श्रीराम सेना आणि मनसेचे आंदोलन लवकरच…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शहरातील पाच कंदील चौकात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. येथील अनधिकृत बांधकामांमुळे पार्किंगसाठी जागाच शिल्लक राहिली नाही. परिणामी, वाहनधारकांना रस्त्यावरच गाड्या उभ्या कराव्या लागतात आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. या समस्येमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ही गंभीर समस्या सोडवण्या साठी श्रीराम सेना अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष स्वप्निल रेड्डी आणि मनसे तालुका संघटक अविनाश घोगरे यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. त्यांनी “HDFC बँकेच्या पार्किंगमधून चारचाकी किंवा दुचाकी गाडी काढून दाखवा आणि रोख बक्षीस जिंका!” असे आव्हान दिले. या आव्हानातून पार्किंग संकट किती गंभीर आहे हे स्पष्ट होते.

या भागात आधीच दोन बँका कार्यरत असून, आता आणखी एका बँकेसाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र, इमारतीखालील जागा पार्किंगसाठी न ठेवता व्यापाऱ्यांसाठी गाळे तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. व्यापाऱ्यांना ग्राहकांच्या कमतरतेचा आणि वाहनधारकांना सतत होणाऱ्या दंडात्मक कारवाईचा त्रास सहन करावा लागत आहे.

नगरपरिषद आणि प्रशासनाने अद्यापही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी आता लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत आमदार माऊली कटके यांनाही लेखी निवेदन देण्यात आले आहे.

शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर तत्काळ तोडगा काढावा!

येत्या काळात जर प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर वाहतूक व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडण्याची शक्यता आहे. नागरिक आणि व्यापारी वर्ग यामुळे संतप्त असून, प्रशासनाने त्वरित कारवाई करून अनधिकृत बांधकामे हटवावीत आणि पार्किंगची सोय करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.