जातेगाव बुद्रुकला खाजगी कार्यक्रमात शालेय मुले वेठीस

राजकीय शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका खाजगी कार्यक्रमासाठी शालेय मुलांना तब्बल 3 ते 4 तास वेठीस धरल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.

जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे नुकतेच एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार, आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपट गावडे, विलास लांडे, बापू पठारे, सुर्यकांत पलांडे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, लाचलुच पथ विभागाचे अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा दुध संघाच्या अध्यक्षा केशर पवार, पुणे विकास मंचचे अध्यक्ष सदाशिव पवार, माजी सभापती प्रकाश पवार, सुभाष उमाप, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यामध्ये अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित असताना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमसाठी थांबवून ठेवण्यात आले होते.

यावेळी अनेक शालेय मुले मुली शिक्षकांचे लक्ष चुकवून पाणी पिण्याच्या तसेच लघुशंकेच्या बहाण्याने बाहेर जात होते. मात्र शिक्षक मुलांना दमदाटी करत पुन्हा कार्यक्रमाचे जागी बसण्यासाठी पाठवून देत असल्याचे दिसत होते. मात्र खाजगी कार्यक्रमासाठी शालेय मुलांना वेठीस धरणे योग्य आहे का असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.