सागरआप्पा दंडवते यांचा अनोखा वाढदिवस साजरा : १५,००० वह्यांचे वाटप व गुणवंतांचा गौरव

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): सामाजिक भान, शिक्षणप्रेम व कर्तव्यभावना, खिलाडूवृत्ती जपत युवा उद्योजक सागरआप्पा दंडवते यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत एक आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात गावातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना १५,००० वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रा. वसंत हंकारे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना म्हटले, “आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवत तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे. मुलींनी खोट्या प्रेमाच्या भूलथापांना बळी पडू नये. आपल्या वर्तनाने आई-वडिलांना दुःख न देता त्यांचा अभिमान वाटेल असे आचरण करावे.”

कार्यक्रमात धाराशिव येथील युवा कबड्डीपटू स्वाभिमान शिंदे, विक्रीकर अधिकारी अभिजित गायकवाड, सनदी लेखापाल शुभम शिंदे, पुणे ग्रामीण पोलीस दलातील अनिल शिंदे, राज्य राखीव पोलीस दलातील प्रशांत कोठावळे, वैद्यकीय क्षेत्रातील शुभम गोडसे, प्रतीक्षा भोसले, माधुरी गडदरे, उदयोन्मुख बॅडमिंटनपटू खुशी इनामदार, तलवारबाजीत यशस्वी ठरलेली सावी ताठे यांचा विशेष सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय, आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही जिद्दीने कबड्डीचा सराव करणाऱ्या स्वाभिमान धनंजय शिंदे या धाराशिव येथील कबड्डीपटूचा रु. ५१,१११/- च्या प्रोत्साहनपर बक्षिसाने गौरव करण्यात आला. यावेळी सागर दंडवते यांनी जाहीर केले की, “भविष्यात कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यास त्यावर होणाऱ्या खर्चाची पूर्ण जबाबदारी मी घेईन.” असे आश्वासन त्यांनी दिले.

सामाजिक जाणीव ठेवत शिरूर येथील अनाथालयातील सर्व विद्यार्थ्यांना अन्नदान करून त्यांनी आपला वाढदिवस खर्‍या अर्थाने विधायक मार्गाने साजरा केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनिल शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश गायकवाड व राजेंद्र लष्करे, तर आभार प्रदर्शन प्रा. सुदाम गायकवाड यांनी केले. हा उपक्रम युवकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, समाजकार्य आणि शिक्षणविकासाचा एक आदर्श नमुना म्हणून सागरआप्पा दंडवते यांच्या वाढदिवसाचा दिवस संस्मरणीय ठरला.