शिरूर तालुका शिक्षक पतसंस्था भ्रष्टाचाराच्या गर्तेत; संचालक मंडळ बरखास्त करण्याची नंदकिशोर पडवळ यांची मागणी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

पतसंस्थेतील अनेक आर्थिक घोटाळ्यांचा आणि कारभारातील अपारदर्शकतेचा पर्दाफाश

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिक्षक सहकारी पतसंस्था ही एक विश्वासाची संस्था म्हणून ओळखली जात होती. मात्र गेल्या दोन पंचवार्षिकांमध्ये या संस्थेचा कारभार पूर्णतः बेजबाबदार, अपारदर्शक आणि भ्रष्टाचारग्रस्त झाला असल्याचा गंभीर आरोप माजी सभापती नंदकिशोर पडवळ यांनी सहाय्यक निबंधक शिरूर यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केला आहे . त्यांनी थेट संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून, संस्थेतील गैरकारभाराचे अनेक ठोस पुरावे त्यांनी समोर ठेवले आहेत. पडवळ यांना स्वतः सत्तेत असताना, सभापतीच्या भूमिकेत असूनही संस्थेतील प्रत्यक्ष कारभारात सहभागी करून घेतले जात नव्हते. काही विचारायला गेल्यास ‘तुम्हाला काय करायचंय ते करा’ अशा उद्दाम भाषेत उत्तर दिलं जायचं. संस्थेतील पारदर्शकतेचा पूर्ण अभाव होता,” असे पडवळ यांनी स्पष्ट केले. अनधिकृत सभासदांना केले ३५ लाखांचे कर्ज वाटप.

संस्थेच्या नियमांना धाब्यावर बसवून, अधिकृत सभासद न केलेल्या व्यक्तींना लाखो रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. संस्थेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप केला आहे.एका व्यक्तीला मिळालेले ३५ लाखांचे कर्ज चुकीच्या पद्धतीने दिल्याचा ठपका सहायक निबंधक यांनी लावला असून, संचालक मंडळाने ते पैसे भरावेत असा आदेशही दिला. मात्र संचालक मंडळाने अपील करत पतसंस्थेच्या पैशातून वकिलांचे खर्च भरले. “सभासद नसलेल्या व्यक्तीसाठी सभासदांच्या पैशांचा वापर हा अन्यायकारक आहे,” असे पडवळ यांचे म्हणणे आहे. कायद्याने बंधनकारक असलेल्या १०१ पूर्व सूचना दिल्यानंतरही काही सभासदांना कर्ज वाटप झाले. हे सरळसरळ नियमानांचे उल्लंघन केले आहे. काही प्रकरणांमध्ये कर्जासाठी आवश्यक असलेले कर्जरोखे न घेता रक्कम वितरित करण्यात आली. हा अत्यंत गंभीर आणि बेकायदेशीर प्रकार आहे.

“सभापती असताना पडवळ यांच्या नावाने बनावट एनओसी तयार करून दिली गेली होती. याचा पुरावा माझ्याकडे आहे,” असे पडवळ यांनी ठामपणे सांगितले आहे. शिरूर तालुक्याबाहेर गेलेल्या सभासदांना कर्ज नाकारण्यात आले. “विरोधी संचालक व पडवळ यांची संमती असतानाही बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव नाकारण्यात आला,” असा खुलासा त्यांनी केला.

तळेगाव ढमढेरे येथे संस्थेच्या मालकीचा ८ हजार स्के.फुटचा हॉल कुठलाही भाडे न घेता फुकट दिला गेला. “याची कुठेही नोंद नाही, यावर पडवळ यांनी मासिक बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. परंतु सांगण्यात आले की हॉल फुकट दिला गेला. हे अधिकार कोणाला वैयक्तिकरित्या दिले गेले?” असा प्रश्न पडवळांनी उपस्थित केला आहे.

“पतसंस्थेच्या खरेदीसाठी घेतल्या जाणाऱ्या निविदा या बनावट आहेत. निविदांवर दुकानांचे नाव, पत्ता, फोन नंबर नाही. इतकंच नाही तर निविदा फोडायच्या आधीच कामे सुरू होतात. म्हणजे निविदा ही फक्त दाखवायची खानापूर्ति आहे,” असे गंभीर आरोप त्यांनी केले.या सर्व प्रकारांवरून स्पष्ट आहे की, पतसंस्थेतील सध्याचे संचालक मंडळ अपारदर्शकता, भ्रष्टाचार व मनमानी कारभाराचे मूळ केंद्र आहे. “या मंडळाला तातडीने बरखास्त करून, नवीन निवडणूक प्रक्रिया राबवली जावी, व संस्थेची पारदर्शकता आणि सभासदांचा विश्वास पुन्हा मिळवावा,” अशी ठाम मागणी पडवळ यांनी प्रशासनाकडे केली आहे.”शिक्षकांसाठी स्थापन केलेली पतसंस्था ही काही मोजक्यांच्या फायद्यासाठी नाही. सभासदांचा प्रत्येक रुपया हा लोककल्याणासाठी वापरला गेला पाहिजे. संचालक मंडळाचा हा भ्रष्ट कारभार थांबवला नाही, तर येत्या काळात आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशाराही मी देत आहे,” असे पडवळ यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.