शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर-हिंगणी रोडवर १५ मे रोजी रात्री अंदाजे ११.३० वाजता शिरुर तहसिलदारांसह महसूल पथकाने कारवाई करत एक हायवा ट्रक (MH-AD-३९१८) अनधिकृतपणे माती वाहतूक करताना पकडला. ट्रकमध्ये सुमारे ५ ब्रास माती आढळली असून, त्याबाबत कोणतीही रॉयल्टी पावती सादर करण्यात आलेली नव्हती.
तपासणीत असे निदर्शनास आले की, सदर माती ही श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथून आणली जात होती व रामलिंग या ठिकाणी नेली जात होती. वाहनचालकाने त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची रॉयल्टी पावती नसल्याचे कबूल केले. तसेच, ट्रक चालकाने मालकाचे नाव “नामा धावडे, रा. सावंतवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर” असल्याचे सांगितले. या प्रकरणी तहसीलदार, शिरूर यांनी नामा धावडे यांना नोटीस बजावली असून, महाराष्ट्र भूगर्भ खनिज (विक्री विकास व विनियमन) अधिनियमांतर्गत कारवाई प्रस्तावित आहे.यामध्ये
रॉयल्टी (५ ब्रास x ₹६००): ₹३,०००,दंड (बाजारभाव ₹१६१० x ५ = ₹८,०५०; पाचपट = ₹४०,२५०),वाहनदंड: ₹२,००,०००,भूमिभाडे: ₹१५० अशी एकूण रक्कम: २,५१,४५० (अक्षरी: दोन लाख एकावन्न हजार चारशे पन्नास रुपये) असा दंड ठोठावण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिकृत पंचनामा महसूल अधिकाऱ्यांनी तयार केला असून, ट्रक सध्या तहसील कार्यालयाच्या आवारात ताब्यात ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे माती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून यापुढे अनाधिकृतरित्या मुरूम,माती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अश्याच प्रकारे धडक कारवाई करण्यात येईल असे शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी सांगितले आहे.