मदयपानास पैसे न दिल्याने आण्णापूरच्या रिक्षाचालकास जबर मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

क्राईम शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): आण्णापुर ता. शिरूर येथील एका रिक्षाचालकास रस्त्यात अडवून तीन जणांनी दमदाटी करत पैसे मागून, पैसे न दिल्याच्या कारणावरून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

या संदर्भात दाखल तक्रारीनुसार, प्रदीप शाहू गायकवाड (वय 28 वर्षे, व्यवसाय – रिक्षा चालक, रा. आण्णापुर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 18 मे रोजी रात्री 10.30 वाजता ते आपल्या रिक्षातून रामलिंग ते आण्णापुर रस्त्यावरून आपल्या घरी जात असताना, बालाजी शाळेजवळ त्यांना 1) जीवन चंद्रकांत सकट, 2) देवा संजय पठारे, 3) रोहीत दीपक भोंडे (सर्व रा. आण्णापुर, ता. शिरूर, जि. पुणे) या तिघांनी अ‍ॅक्टिव्हा मोटारसायकल आडवी लावून अडवले.

त्यांनी गायकवाड यांच्याकडे मद्यपानासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी गायकवाड यांना शिवीगाळ करत वायर व दगडाने डोक्यात व पायावर मारहाण केली. या मारहाणीत गायकवाड जखमी झाले असून, आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार राऊत तपास करत असून गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शहरात अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. शिरूर शहरासह ग्रामीण भागात अल्पवयीन व इतर मुलांमध्ये भाईगिरीची क्रेज मोठ्या वाढत चालली असून त्यांना कायदयाचे भय राहीले नाही. शिरूर पोलिसांनी आता अशा भाई लोकांवर जरब बसविण्यासाठी कठोर उपायोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे .