शिंदोडी (तेजस फडके): कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन फाउंडेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र निमोणे यांच्या संयुक्त विद्यमाने बाल मित्र ग्राम गुनाट येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील व परिसरातील नागरिकांसह बालकांचे आरोग्य तपासणी करून आरोग्यविषयक जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, वजन–उंची मोजमाप, नेत्र व त्वचारोग तपासणी तसेच महिलांसाठी व बालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली. गरज असलेल्या रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले असून पुढील उपचारांसाठी योग्य मार्गदर्शनही देण्यात आले.
तसेच गरोदर महिलांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. आरोग्य अधिकारी यांनी योग्य आहार, जीवनसत्त्वे व काळजी घेण्याविषयी योग्य सल्ले दिले. यावेळी व्हिटॅमिन व कॅल्शियम गोळ्यांचेही वाटप करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत मदत कशी करावी याबाबत नागरिकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. यावेळी सीपीआर देण्याची पद्धत, साप चावणे, विषारी कीटक चावणे, अपघात अशा प्रसंगांत प्राथमिक मदत कशी करावी याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या आरोग्य शिबिराचा एकूण १७५ हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिर यशस्वी होण्यासाठी आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपस्थित रुग्णांना फलहाराचे वाटप करण्यात आले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.