शिरूरचा सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही साखरझोपेत; पाऊस थांबला तरी रस्त्यांवरील खड्डे कायम

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम शिरूर यांच्या हद्दीतील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पावसाळा संपत आला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र अजूनही साखरझोपेत असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील प्रमुख रस्ते, अंतर्गत गाव रस्ते, तसेच शिरूर शहरातून ग्रामीण भागाकडे जाणारे मुख्य मार्ग हे अक्षरशः खड्ड्यांमध्ये विलीन झाले आहेत.

वाहनधारकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, दररोज किरकोळ ते गंभीर अपघात घडत आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ आश्वासनांचा पाऊस आणि प्रत्यक्षात शून्य काम अशी स्थिती निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, अधिकारी आलिशान गाड्यांमध्ये फिरतात, त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे त्यांना दिसतच नाहीत.” अशा उपरोधिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर आणि लोकांच्या चर्चांमध्ये उमटत आहेत.

शिरूर-आण्णापूर, शिरूर- निमोणे – गुनाट – निर्वी रोडवरील अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, दुचाकीस्वारांना विशेषतः मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर खड्ड्यांमुळे पाणी साचून रस्त्याचे रूपांतर लहान तळ्यात झाले आहे.

स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची तात्काळ शास्त्रीय पद्धतीने डांबरी दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.नागरिकांचा सवाल: “करोडो रुपयांचे निधी कुठे जातात?”शिरूर तालुक्याचे रस्ते पुन्हा प्रवासयोग्य कधी होणार? की सार्वजनिक बांधकाम विभाग अजून काही दिवस गोड झोपेतच राहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे