शिरुर (किरण शेलार-पिंगळे) गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘गुरुरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजात सकारात्मक दिशा देणारे, मार्गदर्शक ठरणारे व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
आई-वडील, शिक्षक आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती हीच खरी गुरुस्थाने असून, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते, असे संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी सांगितले. यावेळी रविंद्र धनक सर, ह.भ.प. विलास महाराज पवार, संजय शितोळे सर (संचालक, शितोळे करिअर अकॅडमी), भजनसम्राट भाऊसाहेब धावडे आणि आनंदराव रासकर यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन ‘गुरुरत्न पुरस्कार’ देण्यात आला.
या कार्यक्रमात शितोळे करिअर अकॅडमीत पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन गुरुंचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनीही आपल्या अनुभवातून जीवनाला कलाटणी देणारे विचार मांडले.या सोहळ्याला अण्णापुर गावचे ग्रापंचायत सदस्य केशव शिंदे, डॉ. वैशाली साखरे, पवार मॅडम, अश्विनी नरवडे, रुपाली बोर्डे, राधिका, रोहिदास बोरकर, साहेबराव श्रीमंदिलकर, ललीत खटोड, आदिनाथ थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शंकर रासकर (ग्रा.सदस्य अण्णापूर) तसेच शितोळे करिअर अकॅडमी, शिरूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस फडके यांनी तर आभार केशव शिंदे यांनी मानले.