शिरूर भूमी अभिलेख कार्यालयात शासकीय नियमांची पायमल्ली

मुख्य बातम्या शिरूर तालुका

वरीष्ठांनी तातडीने पाहणी करून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयावर गंभीर आरोपांचे वादळ उठले असून, उपअधीक्षक अमोल भोसले यांच्या कार्यशैलीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कार्यालयीन शिस्त आणि लोकसेवेचे मूल्य धाब्यावर बसवत भोसले हे दरवाजा बंद करून एसीच्या थंडगार हवेत शासनाचे बिल वाढवत आराम करत असल्याचे चित्र नागरिक अनुभवत आहेत. कार्यालयाच्या बाहेर मात्र सामान्य नागरिक घाम पुसत तासन्-तास रांगेत केविलपणे ताटकळत उभे राहतात, ही स्थिती अत्यंत दुर्दैवी असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. शासकीय पदाचा ते दुरुपयोग करत असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून चार झिरो कर्मचारी (अनधिकृत) कर्मचारी हे कार्यालय चालवत असल्याची धक्कादायक माहिती पुराव्यासह समोर आली आहे. इतकेच नव्हे, तर अनेक महत्वाची कागदपत्रे ऑफिसमधून गायब झाल्याची चर्चा देखील नागरिकांत आहे. या संदर्भात रेकॉर्ड रूममध्ये झिरो कर्मचाऱ्यांची मुक्त वावरण्याची तक्रार नागरिक करत असून, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास सत्य उघड होईल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

दरम्यान, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष फिरोज सय्यद यांनीही या प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “भूमी अभिलेख कार्यालयातील झिरो, भुकरमापक कर्मचारी यांनी बिल्डर, भू-माफिया आणि धनदांडग्यांच्या सांगण्यावरून नियमबाह्य मोजण्या करून नकाशे तयार केले आहेत. या नकाशांच्या आधारे मोठ्या इमारतींसाठी परवानग्या मिळवण्यात आल्या आहेत.”

या गैरव्यवहारामुळे अनेक शेतकऱ्यांना न्यायालयीन खटले आणि मानसिक त्रास भोगावा लागत आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी आणि सामान्य जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर, बहुजन मुक्ती पार्टीने शिरूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना आवाहन केले आहे की, “भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित तक्रारी, अन्याय किंवा भ्रष्टाचारासंदर्भात कोणीही त्रास सहन करत असेल, तर त्यांनी निःसंकोचपणे आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.” असे सांगून फिरोज सय्यद यांनी जनतेला आश्वासन दिले आहे.

शिरूरमधील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर व प्रश्नांवर आता जनतेचा दबाव वाढू लागला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी व कारवाई करणे आवश्यक आहे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही बहुजन मुक्ती पार्टीने दिला आहे.