शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

मुख्य बातम्या

नागरिक त्रस्त, सामाजिक कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिरूर–तर्डोबाची वाडी–गोलेगाव–निमोणे–गुनाट–निर्वी, शिंदोडी तसेच शिरूर–रामलिंग–आण्णापूर या मार्गांवर असंख्य खड्डे पडल्याने रस्त्यांचे अक्षरशः “खड्ड्यांचे साम्राज्य” निर्माण झाले आहे.

वाहनधारकांना दररोज या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत असून, अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. पावसाळा संपला असला तरी या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अजूनही दुर्लक्ष करत आहेत. “खड्डे भरण्यासाठी आलेला निधी नक्की जातो कुठे?” असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अनिल जाधव यांना वारंवार तोंडी आणि लेखी स्वरूपात खड्डे भरण्याबाबत कळविण्यात आले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला असून, “ताबडतोब खड्डे न भरल्यास आम्ही उपोषण करू,” असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

यावर अधिक चीड निर्माण करणारी बाब म्हणजे, सहाय्यक अभियंता जाधव हे वारंवार गैरहजर राहतात, अशी स्थानिकांची तक्रार आहे. कार्यालयात गेले की “साहेब पुण्याला मिटिंगला गेले आहेत” असे उत्तर कर्मचाऱ्यांकडून दिले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये “सहाय्यक अभियंता कार्यालयात दाखवा आणि बक्षीस मिळवा!” अशी उपहासात्मक टिप्पणी होत आहे.

या सर्व परिस्थितीमुळे शिरूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांनी शासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरावेत, अन्यथा आंदोलन आणि उपोषणाची लढाई उभारली जाईल, असा इशाराही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.