मुलुंड मेट्रो अपघात प्रकरण! दोषी कंपनीलाच पुन्हा कंत्राट? राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र संताप

इतर

मुंबई: मुलुंड मेट्रो प्रकल्पाशी संबंधित २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर संबंधित कंत्राटदार/सल्लागार कंपनीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र अवघ्या दोन महिन्यांत त्याच कंपनीला पुन्हा काम देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचे प्रदेश प्रवक्ते तसेच युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी तीव्र आक्षेप घेत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

“अपघात करा, जीव घ्या आणि पुन्हा कंत्राट मिळवा—हा नवा मॉडेल प्रशासनाने सुरू केला आहे का?” असा सवाल उपस्थित करत, कारवाई केवळ कागदोपत्री औपचारिकता ठरली का, असा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच दोषी ठरलेली कंपनी इतक्या लवकर पुन्हा ‘पात्र’ कशी ठरते आणि तिला कोणाचा आशीर्वाद आहे, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

मातेले यांनी या प्रकरणात पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचा आरोप करत संभाव्य संगनमत, हितसंबंधांचा संघर्ष आणि आर्थिक अनियमिततेची शक्यता व्यक्त केली. “जनतेचा जीव स्वस्त आणि कंत्राटदार महाग” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का, असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केला.

प्रमुख मागण्या:

अपघातासंदर्भातील सविस्तर चौकशी अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा

संबंधित कंपनीवर करण्यात आलेल्या कारवाईचे तपशील जाहीर करावेत

कंपनीला पुन्हा काम देण्याचा निर्णय तात्काळ स्थगित करावा

स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती नेमावी

जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी

या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल तसेच न्यायालयीन लढा उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला.

“अपघात त्यांचा, बळी जनतेचा… आणि नफा ठेकेदारांचा—हा खेळ आता थांबवावाच लागेल,” असा संतप्त सूर त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत