शिंदोडी (तेजस फडके) शिरुरच्या पुर्व भागात रस्त्यांची दुरावस्था झाली असुन सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याने काही ठिकाणी झालेली रस्त्यांची कामे दर्जाहीन असल्याचे दिसत असुन शिरुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अधिकारीही कधी जागेवर सापडत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे रस्त्याच्या कामाकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.
गुनाट ते शिंदोडी हा सुमारे पाच किमी लांबीचा रस्ता सन 2010 साली पंतप्रधान ग्रामसडक योजनेतुन तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निधीतुन करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 13 वर्षे किरकोळ खड्यांची दुरुस्ती वगळता या रस्त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. तसेच काही वर्षांपुर्वी करडे ते निमोणे रस्त्याचे लंघेवाडीपर्यंत रस्त्याच्या साईड पट्यांचे रुंदीकरण करत काम करण्यात आले. परंतु लंघेवाडी ते निमोणे या रस्त्यावर फक्त किरकोळ दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे या रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे.
रस्त्यावरील खड्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास…
निमोणे ते लंघेवाडी आणि गुनाट ते शिंदोडी या रस्त्यांना ठिकठिकाणी मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठया प्रमाणात त्रास होत असुन रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडल्याने अनेक दुचाकीस्वारांना मणक्याच्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. तसेच अनेकवेळा या रस्त्यावर अपघातही झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नॉट रिचेबल…
शिरुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील अधिकारी कधीच जागेवर नसतात. अनेकवेळा त्यांच्याकडे काही कामानिमित्त माहिती विचारायला गेल्यास “साहेब बाहेर गेलेत” हे सरकारी उत्तर मिळते. तसेच त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या पाठपुराव्याला यश
गुनाट -शिंदोडी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने वेळोवेळी पाठपुरावा करत सडेतोड वृत्त प्रसारित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत आठ दिवसापुर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने गुनाट -शिंदोडी रोडचे काम सुरु केले आहे. परंतु या पाच किमी रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवुन दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.