न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील कळवंतवाडी (आनोसेवाडी) परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतात असलेल्या रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याने परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला असुन शेतकरी व नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी लकीचंद मोरसिंग राठोड (वय २७, तंत्रज्ञ, रांजणगाव गणपती शाखा, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार (दि ९) जानेवारी सायंकाळी ६ ते (दि १०) जानेवारी सकाळी ९ च्या दरम्यान कळवंतवाडी, आनोसेवाडी (ता. शिरूर) येथील शेतगट क्रमांक ८५९ मध्ये असलेल्या १००/२२ के.व्ही.ए. क्षमतेचे रोहीत्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरची लोखंडी प्लेट तोडून आतले ऑईल सांडवून दिले तसेच त्यातील सुमारे ४० किलो वजनाच्या तांब्याच्या तारांची चोरी केली. सदर तारांची किंमत प्रति किलो ६०० रुपये प्रमाणे अंदाजे २४ हजार रुपये इतकी असुन त्यामुळे वीज वितरण यंत्रणेला मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेप्रकरणी रविवार (दि ११) रोजी अज्ञात चोरट्याविरोधात शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास सहाय्यक फौजदार भोते करीत आहेत.
शिरुर तालुक्यात सतत वाढत असलेल्या ट्रान्सफॉर्मर तसेच तांब्याच्या चोरीच्या घटनांमुळे वीज यंत्रणेची सुरक्षा ऐरणीवर आली असून, प्रशासनाने तात्काळ कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.