शिरूर तालुक्यातील चांडोह गावात बिबट्याचा महिलेवर हल्ला

मुख्य बातम्या शिरूर तालुका

पिंपरखेड (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथे बिबट्याने पुन्हा एकदा धुडगूस घातला. मंगळवारी (दि.२०) रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर आलेल्या संगिता अंकुश शिंदे या ५० वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. या हल्ल्यात शिंदे यांच्या मानेवर खोलवर जखमा झाल्याने पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्यांना नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून मुक्त संचार वाढलेल्या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त गावकऱ्यांनी केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेली बेस कॅम्पच्या टीमसह वनकर्मचारी महेंद्र दाते यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली असून घटनास्थळी वनविभागाकडून दोन पिंजरे लावण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

सदर पिडीत महिला संगिता शिंदे या पहाटे लघुशंकेसाठी घरातून बाहेर आल्या असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट त्यांचेवर मागील बाजूने मानेवर हल्ला केला. यावेळी शिंदे यांनी जोराचा आरडाओरडा केल्याने शेजारील रहिवाशी धावत आल्याने बिबट्याने धूम ठोकली मात्र प्रसंगावधान राखल्याने या हल्ल्यातून आपण थोडक्यात बचावल्याचे भयभीत झालेल्या शिंदे यांनी सांगितले.

शिरूर च्या बेट भागातील जांबूत, पिंपरखेड, काठापूर खुर्द , चांडोह परिसरात मागील दोन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात सुमारे पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कित्येकांवर हल्ले झाले तर मोठ्या प्रमाणात पशुधनही धोक्यात आलेले असून दरवर्षी पावसाळा सुरु होताच बिबट्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ होत असताना दिसून येते . वनविभागाने या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेता योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.