दामूशेठ घोडे यांच्याकडून ‘हर घर तिरंगा’ विषयी जनजागृती

शिरूर तालुका

सविंदणे: टाकळी हाजी (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून हा सण साजरा व्हावा यासाठी आदर्श सरपंच दामूशेठ घोडे यांनी जनजागृती मोहीम राबवली आहे. एक पिकअप गाडी सजावट करुन भारताची प्रतिमा आणि स्वातंत्र्य सेनानी यांचे पोस्टर लावून घोषणा लिहिल्या असून देशभक्तीपर गीते वाजवत गाडी संपूर्ण परिसरात फिरविली जात आहे. ही गाडी म्हणजे एक वेगळे आकर्षण ठरले आहे.

ग्रामपंचायत कार्यालय, प्रत्येक शासकीय कार्यालय, शाळा येथे ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर गावामध्ये प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने फेरीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी फेरी बरोबर असणाऱ्या गाडीकडे पाहून देशभक्तीपर गीते ऐकून ग्रामस्थांमध्ये चैतन्य निर्माण होवून मोठ्या संख्येने ग्रामस्थ फेरीमध्ये सहभाग घेत होते. भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जवान जय किसान अशा प्रकारे घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रभातफेरी काढण्यात येते. त्यावेळी शालेय मुले आणि शिक्षक यांची संख्या मोठी असते. परंतु ही प्रभातफेरी मात्र ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे लक्षवेधी ठरली. नुकतीच ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली असून त्यावेळी प्रचारासाठी शक्तिप्रदर्शन करण्यात येत होते त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत नागरिकांनी देशप्रेम व्यक्त केले.

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. परिसरात अपघात झाला तर रुग्णवाहिका येण्यास उशीर होत होता. त्यामुळे मी स्वतः गावासाठी व परिसरासाठी रुग्णवाहिका दिलेली आहे. त्याचप्रमाणे यापुढे लोकहिताचे, शासकीय, सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर प्रबोधनासाठी माझी पिकअप गाडी सर्व सुविधांसह जनतेसाठी उपलब्ध ठेवणार आहे, असे टाकळी हाजीचे सरपंच दामुशेठ घोडे यांनी सांगितले.