प्रेमविवाहाचा राग ठेवून लोखंडी कोयत्याने तरुणावर हल्ला, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना टाकळीहाजी (ता. शिरूर) येथे घडली आहे. कुडांई मेन्स पार्लरमध्ये हे नाट्य घडले असून दुकानाची तोडफोड करत दुकानमालकाच्या हातावर व पाठीवर लोखंडी कोयत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी तिघांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय हौशीराम वाघ (वय २२, रा. तामकरवाडी, टाकळीहाजी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या पत्नी स्नेहा हिच्यासह टाकळीहाजी येथे वास्तव्यास असून तेथील कुडांई मेन्स पार्लर ही सलून दुकान चालवतात. दोन महिन्यांपूर्वी दत्तात्रय आणि स्नेहा यांचा आळंदी येथे प्रेमविवाह झाला होता. मात्र, स्नेहाचे नातेवाईक याविरोधात होते. याआधीही स्नेहाचा मावसभाऊ जीवन रविंद्र गायकवाड आणि इतरांनी दत्तात्रयला जीवे मारण्याची धमकी दिली होती, यासंबंधी तक्रारही दाखल करण्यात आली होती.

दि. ४ जुलै रोजी रात्री ९ वाजता दत्तात्रय आपल्या सलूनमध्ये आशुतोष भाकरे याचे केस कापत असताना, अचानक तिघेजण दुकानाचे शटर उघडून आत घुसले. त्यांच्यात जीवन रविंद्र गायकवाड (रा. कानगाव, ता. दौंड) याच्यासह शारुख बाबू शेख (वय २६) व प्रशांत हनुमंत साठे (वय १९, दोघेही रा. पाटस, ता. दौंड) यांचा समावेश होता.

आरोपींनी दुकानाच्या काचा फोडल्या, साहित्याची नासधूस केली आणि जीवन गायकवाडने लोखंडी कोयत्याने दत्तात्रयच्या डाव्या मनगटावर आणि पाठीवर गंभीर वार केले. त्यानंतर आरोपींनी दत्तात्रयला जीवे मारण्याची धमकी दिली व ते मोटारसायकलवरून राजनगावच्या दिशेने पळून गेले. दरम्यान, गावकऱ्यांनी पाठलाग करून दोघा अनोळखी आरोपींना पकडून टाकळीहाजी पोलिस दुरक्षेत्रात आणले. चौकशीत त्यांची नावे शारुख शेख आणि प्रशांत साठे अशी असल्याचे समोर आले.

दत्तात्रय यांना शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्या तक्रारीवरून वरील तिघांविरुद्ध गंभीर दुखापत, तोडफोड व जीव घेण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार भगत यांनी फिर्याद नोंदवली असून, तपास पो.ह.वा. आगलावे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रेमविवाहाच्या नावावर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.