नवे पोलीस निरीक्षक, जुन्याच समस्या राहणार का? शिरूर तालुक्यात ‘ॲक्शन’ची प्रतीक्षा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील शिरूर, शिक्रापूर आणि रांजणगाव गणपती या तीनही पोलीस ठाण्यांमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, गुन्हेगारीवर आळा बसेल आणि अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी केवळ अधिकारी बदलून परिस्थिती बदलेल का, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

रांजणगाव गणपती पोलीस ठाण्याची जबाबदारी कुमार रामचंद्र कदम यांनी स्वीकारली असून शिरूर पोलीस ठाण्याची धुरा विनोद भगवान पाटील यांच्याकडे, तर शिक्रापूर पोलीस ठाण्याचे नेतृत्व चंद्रशेखर मोहनराव यादव यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. औद्योगिक आणि ग्रामीण भागाचे मिश्र स्वरूप असलेल्या या क्षेत्रात कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

अवैध धंद्यांवर कारवाईची अपेक्षा

तालुक्यात अवैध दारू विक्री, मटका-जुगार, ऑनलाइन बेटिंग, अमली पदार्थांची कथित विक्री, गुटखा तस्करी, डिझेल व औद्योगिक स्क्रॅप चोरी तसेच मुरूम, माती आणि वाळूच्या अवैध उत्खननाबाबत सातत्याने चर्चा होत असते. नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारीही पुढे येत असल्याचे सांगितले जाते.

महामार्गालगत काही लॉजिंगमध्ये कथित गैरप्रकार सुरू असल्याच्या चर्चांमुळेही नागरिकांमध्ये नाराजी आहे. या सर्व प्रकारांवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करून पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करण्याचे मोठे आव्हान नव्या अधिकाऱ्यांसमोर आहे.

रोडरोमिओ आणि स्टंटबाजीचा त्रास

शाळा-महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंचा वावर, बिननंबरच्या वाहनांची वाढ, काळी फिल्म लावलेल्या गाड्या आणि भरधाव वेगाने स्टंटबाजी करणाऱ्या युवकांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे बोलले जाते.

याशिवाय रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली, नशेच्या पदार्थांचे कथित सेवन आणि विक्री याबाबतही स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमुळे पालकांमध्ये अस्वस्थता वाढली असून महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी होत आहे.

विश्वास जिंकण्याची खरी परीक्षा

नव्या पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीनंतर नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. रात्रीच्या गस्तीत वाढ, सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई, अवैध धंद्यांचे उच्चाटन, वाहतूक शिस्तीची अंमलबजावणी आणि महिला सुरक्षेला प्राधान्य याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येणाऱ्या काही दिवसांत शिरूर, शिक्रापूर आणि रांजणगाव गणपती पोलीस ठाण्यांकडून कोणत्या प्रकारची ठोस कारवाई होते, यावरच नव्या अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीची पहिली छाप उमटणार आहे. त्यामुळे संपूर्ण शिरूर तालुक्याच्या नजरा सध्या नव्या पोलीस निरीक्षकांच्या पहिल्या मोठ्या ‘ॲक्शन’कडे लागल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत