इस्लामपूरच्या नामांतराच्या विषयाबाबत जयंतराव पाटील यांनी शिष्टमंडळासह घेतली राज्यपालांची भेट

महाराष्ट्र

‘ईश्वरपूर’ नामांतर करताना ‘उरूण’चाही समावेश व्हावा यासाठी शासनाला निर्देश द्यावेत; जयंतराव पाटील यांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई: इस्लामपूरच्या नामांतराच्या विषयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंतराव पाटील यांनी आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची राजभवन येथे शिष्टमंडळासह भेट घेतली. या दरम्यान त्यांनी राज्यपाल महोदयांना निवेदनही दिले आहे.

जयंतराव पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याबाबत माहिती दिली आहे. यात ते म्हणाले की, ‘उरूण इस्लामपूर’ शहराच्या नामांतरातून ‘उरुण’ शब्द वगळण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने आज मा.राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन दिले.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर शहराचे नाव ‘ईश्वरपूर’ करण्याची घोषणा शासनाने पावसाळी अधिवेशनात केली आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठीही पाठविण्यात आला आहे. मात्र नामकरणाच्या या प्रस्तावात ‘उरुण’ शब्द वगळलेला आहे. उरुण हा ऐतिहासिक परंपरा असलेला भाग आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून याचा उल्लेख आढळतो. तर सोळाव्या शतकानंतर इस्लामपूरचा उल्लेख आढळतो. यामुळे या शहराला “उरुण-इस्लामपूर” अशीच ओळख असून शहराने सामाजिक सलोखा जपला आहे. राज्य शासनाने प्रस्तावित केल्याप्रमाणे केंद्र सरकारने प्रस्ताव मंजूर केला तर “उरुणचे” अस्तित्वच नष्ट होईल अशी भीती जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली.

‘उरुण इस्लामपूर’ शहराच्या नामांतराच्या प्रस्तावात उरुण नावाचा समावेश करुन प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याची उरुण वासियांची आग्रहाची मागणी असून त्यासाठी ते दिनांक १ ऑगस्ट, २०२५ पासून साखळी उपोषण करित आहेत. या उपोषणस्थळी शासनाच्या विविध मंत्री महोदयांनी भेटी देवून आश्वासने दिली आहेत. परंतु, राज्य मंत्रीमंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही अशी खंत व्यक्त करत असताना राज्यपाल महोदयांनी याबाबत सकारात्मक भुमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना याबाबत सूचना करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे अशी माहिती त्यांनी शेवटी दिली.