ध्वजारोहणासाठी पुढे आले अन् काळाने घात केला

महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखत मुख्याध्यापकांचा हृदयविकाराने मृत्यू

बुलढाणा: देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण सोहळा सुरू असतानाच मुख्याध्यापकांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज सकाळी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप राठोड हे या कार्यक्रमाचे नियोजन उत्साहात करत होते. विद्यार्थी, शिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने शाळेच्या प्रांगणात उपस्थित होते.

ध्वजारोहणासाठी पुढे सरसावत असतानाच दिलीप राठोड यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि सर्वांसमोरच ते जमिनीवर कोसळले. हा प्रसंग पाहून उपस्थित विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली.

तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. कर्तव्यावर असतानाच आणि राष्ट्रध्वजासमोरच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच मोहेगाव गावावर शोककळा पसरली असून, दिलीप राठोड यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.