मुंबई: आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार, व्हिडिओ KYC आणि बायोमेट्रिक पडताळणी यांचा वापर झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्हेगारांनीही फसवणुकीच्या नव्या पद्धती शोधल्या आहेत. “दादा, जरा फोन बघाल का?”, “OTP वाचून सांगा”, “फेस स्कॅन करा” अशा विनंत्यांच्या माध्यमातून नागरिकांची बायोमेट्रिक माहिती, आवाज आणि चेहऱ्याचे तपशील चोरून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
सायबर तज्ज्ञांच्या मते, अनेक ठिकाणी आधीच व्हिडिओ कॉल सुरू ठेवून किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन ठेवून नागरिकांना मदतीच्या नावाखाली जाळ्यात ओढले जाते. संबंधित व्यक्ती फोन हाताळताच बोटांचे ठसे, चेहऱ्याची माहिती, आवाज यांचे रेकॉर्डिंग होते. त्यानंतर काही मिनिटांत किंवा तासांत त्या माहितीचा वापर करून फेक KYC, कर्ज प्रक्रिया किंवा बँक व्यवहार केल्याची उदाहरणे वाढत आहेत.
विशेष म्हणजे, ही टोळी केवळ मॉल किंवा मेट्रो शहरांपुरती मर्यादित नसून सरकारी दवाखाने, रेल्वे स्टेशन, बँक परिसर, रेशन दुकाने, धार्मिक स्थळे, नोकरी मेळावे अशा गर्दीच्या ठिकाणी सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. “ऑनलाइन अपॉइंटमेंट”, “Video KYC”, “स्कॉलरशिप रजिस्ट्रेशन”, “पोलिस व्हेरिफिकेशन” अशा नावाखाली नागरिकांना लक्ष्य केले जाते.
सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत :
अनोळखी व्यक्तीचा मोबाईल हातात घेऊ नये
कोणताही OTP मोठ्याने वाचू नये
रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी बायोमेट्रिक अथवा फेस स्कॅन करू नये
“सरकारी योजना” सांगून अंगठा किंवा सेल्फी मागितल्यास सावध राहावे
संशयास्पद व्यवहार झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा
आवश्यक असल्यास CIBIL फ्रीझ करून आर्थिक नुकसान रोखावे
दरम्यान, सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असले तरी “डिजिटल साक्षरता” तितक्याच प्रभावीपणे पोहोचणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. ग्रामीण भागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि कमी तांत्रिक माहिती असलेल्या लोकांसाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.सायबर गुन्हेगार आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), व्हॉइस क्लोनिंग आणि बायोमेट्रिक डेटाचा वापर करून अधिक प्रगत पद्धतीने फसवणूक करत असल्याने नागरिकांनी “मदत” आणि “सावधगिरी” यामध्ये योग्य समतोल राखणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.