WhatsApp आता मोफत राहणार नाही? ‘सबस्क्रिप्शन मॉडेल’ आणि स्टेटसवर जाहिरातींची तयारी

महाराष्ट्र

मुंबई: जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप ‘व्हॉट्सअॅप’ (WhatsApp) आता युजर्ससाठी मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत पूर्णपणे मोफत सेवा देणारा व्हॉट्सअॅप लवकरच ‘सबस्क्रिप्शन मॉडेल’ आणण्याची शक्यता आहे. यामुळे काही खास फीचर्स वापरण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, मेसेज पाठवणे आणि चॅटिंग सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत राहणार आहे. मात्र हा बदल प्रामुख्याने ‘स्टेटस’ (Status) फीचर साठी असणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या बीटा व्हर्जन (2.26.3.9) च्या कोडमध्ये असे संकेत मिळाले आहेत की, कंपनी स्टेटस टॅबमध्ये जाहिराती (Ads) दाखवण्याची तयारी करत आहे.

ज्या युजर्सना जाहिराती पाहायच्या नसतील, त्यांच्यासाठी ‘पेड सबस्क्रिप्शन’ पर्याय उपलब्ध होऊ शकतो. म्हणजेच भविष्यात युजर्ससमोर दोन पर्याय असू शकतात

जाहिरातींसह मोफत व्हॉट्सअॅप

जाहिरातींशिवाय पेड व्हॉट्सअॅप

ज्याप्रमाणे युट्यूब आणि स्पॉटिफायवर प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतल्यास जाहिराती बंद होतात, त्याच धर्तीवर व्हॉट्सअॅप देखील आपले उत्पन्नाचे नवे मार्ग शोधत आहे.

सध्या व्हॉट्सअॅपकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी हे फीचर चाचणीच्या टप्प्यात असल्याचे संकेत आहेत. भविष्यात बिझनेस अकाउंट्सद्वारे जाहिराती फेसबुक आणि इंस्टाग्रामप्रमाणे थेट व्हॉट्सअॅप स्टेटसवर दिसण्याची शक्यता आहे.

थोडक्यात सांगायचं तर, व्हॉट्सअॅप आता केवळ मेसेजिंग अॅप न राहता कमाईचे नवे मॉडेल स्वीकारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे भविष्यात “जाहिरातींसह मोफत व्हॉट्सअॅप” किंवा “जाहिरातींशिवाय पेड व्हॉट्सअॅप” असे दोन पर्याय युजर्ससमोर असू शकतात.