बारामतीत पवार घराण्याची एकजूट! शरद पवार–रोहित पवार एकाच व्यासपीठावर

महाराष्ट्र राजकीय

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि पार्थ पवार यांचा बारामतीत घेतलेल्या सांत्वन भेटीतचा फोटो समोर आला आहे. 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या निधनानंतर पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित न राहता बारामतीत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. बारामतीतील सहयोग बंगला येथे शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य नागरिकांच्या सांत्वन भेटीला उपस्थित होते.

आजच्या भेटीत शरद पवार, पार्थ पवार आणि रोहित पवार यांचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये शरद पवार पार्थ व रोहित पवार यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर नागरिक भेटीसाठी येत होते, आणि आज हा सांत्वन भेटीचा शेवटचा दिवस होता.

याशिवाय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर उभारण्याचे ठरवण्यात आले आहे. या संदर्भात शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी चर्चा केली आहे.

शरद पवार यांनी कालच माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाल्याबद्दल स्वागतार्ह असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी येत असताना त्यांच्या विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात त्यांच्यासह इतर चार जणांचा मृत्यू झाला होता.