संदीप शेळके शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये; सपकाळ यांचा फडणवीसांना ‘गेट वेल सून’ टोला

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: बुलढाणा जिल्ह्यातील धडाडीचे नेते संदीप शेळके यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.यावेळी सपकाळ यांनी शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, प्रदेश उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे, तसेच एस.सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले की, देशात आणि राज्यात भाजपचे सरकार सत्तेच्या गर्वात मनमानी कारभार करत आहे. विभाजनकारी राजकारणाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचा सर्वसमावेशक विचारच सक्षम आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पक्षात काम करणाऱ्यांना मोठ्या संधी मिळतील.

फडणवीसांना सपकाळ यांचा टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत सपकाळ म्हणाले की, “कोण हर्षवर्धन सपकाळपासून बिनडोक सपकाळपर्यंत फडणवीसांचा प्रवास झाला आहे. त्यांनी मला डोके नाही असे म्हटल्याचे आश्चर्य नाही. शतकानुशतके बुद्धी ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे, असा त्यांचा समज आहे.”

याच विचारधारेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारण्यात आला आणि बहुजन समाजाला ज्ञानापासून दूर ठेवण्यात आले, असा आरोप करत त्यांनी फडणवीसांना “गेट वेल सून” असा टोला लगावला.

गॅस तुटवड्यावर सरकारला इशारा

एलपीजी गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, युद्धजन्य परिस्थितीमुळे तुटवडा निर्माण झाला असला तरी सरकारकडे योग्य नियोजन नसल्याने समस्या गंभीर झाली आहे. हॉटेल्स व खानावळी बंद पडण्याची वेळ येऊ नये म्हणून सरकारने सर्वांशी चर्चा करून गॅस आणि इंधन पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.