इराण: हॉरमुझ स्ट्राईट परिसरात सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना भारतातील इंधन स्थितीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.
इराण कडून होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक बंद केल्याने अनेक कच्च्या तेलाची जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असून त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने हॉटेल व्यवसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव Sujata Sharma यांनी देशातील इंधन स्थितीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारताला दररोज सुमारे ५५ लाख बॅरल कच्च्या तेलाची गरज असते आणि सध्या त्याचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. भारत हा जगातील चौथा मोठा रिफायनरी देश असून देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादन सुमारे २८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
शर्मा यांनी स्पष्ट केले की, देशात पेट्रोलियम उत्पादनाची कोणतीही कमतरता नाही. भारताच्या नैसर्गिक वायूच्या गरजेपैकी सुमारे ६० टक्के गॅस आयातीद्वारे पूर्ण केला जातो आणि सध्या त्याचाही पुरवठा नियमित सुरू आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना कमर्शियल गॅस सिलिंडर आणि ४८ हजार लिटर रॉकेचा पुरवठा केला जाणार असून कोळशाचा पुरवठा देखील वाढवण्यात आला आहे.तसेच वितरणाबाबतही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात ४५ दिवसांनी एक सिलिंडर, तर शहरी भागात २५ दिवसांनी एक सिलिंडर देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, शिपिंग मंत्रालयाचे अधिकारी Rajesh Kumar यांनी सांगितले की जहाजांसाठी विशेष अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी २४ तास कंट्रोल रूम सुरू ठेवण्यात आली आहे. भारतीय नाविकांच्या सुरक्षेला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय दूतावास सक्रिय असल्याची माहितीही परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.