शिरूरमध्ये अवैध गोहत्या प्रकरणातील सराईत आरोपी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात अवैधपणे गोहत्या करून गोमांस विक्री करणाऱ्या तसेच वारंवार गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या एका सराईत आरोपीवर कठोर कारवाई करत त्याला एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेत अकोला मध्यवर्ती कारागृहात दाखल केले असून या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का बसला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी मागील पाच वर्षांतील गुन्हेगारी नोंदींचा आढावा घेण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. जामिनावर सुटून पुन्हा गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती अद्ययावत करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

या मोहिमेअंतर्गत दरोडे, जबरी चोरी, महामार्गांवरील लूटमार, व्यावसायिकांकडून खंडणी, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तसेच प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गोवंश कत्तलीसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

याच पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा अब्दुलहक जलील कुरेशी (शेख) (वय ४६) याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात आली. सध्या तो खाटीक आळी, शिरूर (ता. शिरूर, जि. पुणे) येथे वास्तव्यास असून त्याचे मूळ गाव झेंडीगेट, ता. व जि. अहिल्यानगर आहे.

पोलिसांच्या नोंदीप्रमाणे आरोपीविरुद्ध यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. संगनमत करून जनावरांची अवैध कत्तल करणे, जनावरांना ठार मारणे किंवा विकलांग करणे, तसेच पोलिस कारवाईदरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना धाक दाखवून कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, फौजदारी स्वरूपाचा बलप्रयोग करणे व धमकावणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आढळून आला आहे. जुन्या भारतीय दंड विधानासह भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत त्याच्यावर एकूण तीन गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अब्दुलहक कुरेशी हा परिसरात सराईत व धोकादायक गुन्हेगार म्हणून ओळखला जात असल्याने त्याच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष होते. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी त्याच्याविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून तो पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्याकडे सादर केला होता.

सदर प्रस्तावाचा सखोल आढावा घेतल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तो पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठविला. आरोपीचा गुन्हेगारी इतिहास आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन जिल्हादंडाधिकाऱ्यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.

जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिरूर पोलिसांनी विशेष पथके तयार करून शोधमोहीम राबवली. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत १२ मार्च २०२६ रोजी अब्दुलहक कुरेशी याला ताब्यात घेण्यात आले. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याला अकोला मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले असून एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे शिरूर परिसरातील अवैध गोहत्या व गोमांस विक्रीसारख्या गुन्ह्यांना आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच जिल्ह्यातील इतर सराईत गुन्हेगारांनाही हा इशारा असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे तसेच शिरूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे शिरूर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी मदत होणार असून गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार असल्याचे सांगण्यात आले.