निघोज मधील हत्येच्या घटनेनंतर शिरूर मध्ये खळबळ ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण 

क्राईम

शिरुर (सतिश डोंगरे): निघोज मधील पवार कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची पुसटशी बातमी काल सायंकाळी उशिरा निघोज मध्ये धडकली मात्र आजचा दिवस उजाडताच सात जणांची हत्या झाल्याचे उघड झाले अन् संपूर्ण निघोज नखशिखांत हादरले गावात सन्नाटा पसरला तसेच शेजारीच असलेल्या शिरुर तालुक्यातही या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

हे हत्या झालेले कुटुंब जरी मूळचे निघोजचे नसले तरी गेली ८ ते १० वर्षांपासून ते निघोज मध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे निघोज मधील अनेकांशी त्यांची जवळीक होती. गावातून मळगंगा देवीच्या कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ते पार टाकून रहत होते. गावातील अनेकांची शेतीची छोटीमोठी कामे, पाइपलाईन साठी खोदाईची कामे ते इमानेइतबारे करीत होते. त्यांच्या एकूण तीन मुलांपैकी दोन लहान मुले गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत जात होती. या शाळेतील शिक्षकांना आणि मुलांना आज ही बातमी समजल्यानंतर शाळकरी मुलांच्या मध्ये एकच घबराट पसरली. आज गावात चौका चौकात लोक यांचं घटनेची चर्चा करताना दिसून येत होते. मात्र बाहेरील व्यक्तीबरोबर कोणी ही काही बोलायला तयार नव्हते.

विशेष म्हणजे ज्यांनी हे कृत्य केले ते आरोपी ही मृत कुटुंबियांच्या नात्यातील आहेत. आरोपींचे गावात कायमस्वरूपी सुसज्ज घर असून ते बऱ्यापैकी सधन कुटुंबातील आहे. त्यांचे स्वतःचे जेसीबी असून ते कान्ट्रॅक्ट पध्दतीने भाडेतत्त्वावर देत असत. कौटुंबिक नात्यातून नाजूक प्रकरणातून हे हत्याकांड घडल्याची गावात कुजबूज आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावच्या इतिहासात पहिल्यांदाच हे हत्याकांड घडले असून विशेषतः लहान कोवळ्या निष्पाप निरागस मुलांच्या हत्येने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या पाच सहा दिवसांपासून त्यांनी गावातून आपला डेरा हलविला असला तरी ते आपल्या मूळ गावी गेले असावेत असा गावातील लोकांचा समज होता मात्र या हत्याकांडाची बातमी गावात पसरताच गाव सुन्न होऊन गावात एकच सन्नाटा पसरला आहे.