निमोणे (तेजस फडके): कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावामुळे आणि सरकारच्या सतत बदलणाऱ्या निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्च प्रचंड वाढला असताना बाजारात मिळणारा दर मात्र तोट्याचा ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे हे उद्या शनिवार (दि १४) रोजी न्हावरे येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसरात दुपारी ४:३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या संवाद मेळाव्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, सरकारचे धोरण आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुढील लढ्याची दिशा यावर सविस्तर चर्चा होणार आहे. सध्या कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे खत, बियाणे, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे, तर दुसरीकडे बाजारात कांद्याचे दर कोसळले आहेत.
त्यातच केंद्र सरकारच्या निर्यात धोरणातील अनिश्चितता आणि निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून, या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या संवाद मेळाव्यात जयदीप भदाणे (जिल्हाध्यक्ष, नाशिक), भगवान जाधव (जिल्हा समन्वयक, नाशिक), राहुल कान्होरे (जिल्हाध्यक्ष, अहिल्यानगर) आणि ईश्वर गायकर (युवक तालुकाध्यक्ष, जुन्नर) हे देखील उपस्थित राहणार असून ते शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीत कांदा उत्पादकांच्या समस्या जाणून घेत पुढील आंदोलन, सरकारवर दबाव आणण्यासाठीच्या रणनीती आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठीची लढाई यावर दिशा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे शिरुर तालुक्यासह परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आयोजकांनी परिसरातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या व्यथा मांडाव्यात, असे आवाहन केले आहे.