NEET 2026 पुनर्परीक्षा निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

महाराष्ट्र

“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा”

मुंबई: NEET 2026 परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी पुनर्परीक्षेच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केंद्र सरकार आणि NTA वर जोरदार टीका केली आहे.

देशातील तब्बल २२ लाख ७९ हजार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सरकार खेळ करत असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाले, त्या केंद्रांवरच पुनर्परीक्षा घेणे अपेक्षित होते. मात्र संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांवर पुनर्परीक्षेचा बोजा टाकून सरकार स्वतःच्या निष्काळजीपणावर पडदा टाकत आहे.

“सरकारच्या व्यवस्थेमुळे पेपर फुटला, मग विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा का द्यावी?” असा सवाल उपस्थित करत मातेले यांनी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक ताणाचा मुद्दा उपस्थित केला. वर्षानुवर्षे मेहनत घेणारे विद्यार्थी, कर्ज काढून क्लासेस लावणारे पालक आणि रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच स्पर्धेत ढकलणे अमानुष असल्याचे त्यांनी म्हटले.

“डिजिटल इंडियाच्या घोषणा करणारे सरकार एक संवेदनशील परीक्षा सुरक्षित घेऊ शकत नाही, ही गंभीर बाब आहे. विद्यार्थी हे सरकारच्या अपयशावर झाकण ठेवण्यासाठी वापरायचे प्रयोगातील प्राणी नाहीत,” अशी टीकाही त्यांनी केली.

NTA ही संस्था विद्यार्थ्यांचा विश्वास गमावल्याचा आरोप करत तिला तात्काळ बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री Dharmendra Pradhan यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत