२५ मेपर्यंत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
पुणे: सत्यजीत तांबे यांच्या पुढाकारातून पुणे येथे शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांवर गुरुवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी जवळपास ६ वाजेपर्यंत चालली. राज्याचे शिक्षण आयुक्त सुचेंद्र प्रतापसिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण संस्थांशी संबंधित विविध प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत केवळ चर्चा करून प्रश्न सुटत नसून त्यावर ठोस निर्णय आणि प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याची भूमिका आमदार तांबे यांनी स्पष्टपणे मांडली. विशेषतः नाशिक विभागातील शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावरील प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दि. २५ मेपर्यंत प्रशासनाकडून ठोस निर्णय आणि कार्यवाही न झाल्यास पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या तीन वर्षांपासून विधानपरिषदेच्या सभागृहात शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न सातत्याने उपस्थित करत असल्याचे तांबे यांनी नमूद केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण संस्थांच्या प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आक्रमक आणि मुद्देसूद भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले असल्याचेही त्यांनी सांगितले.
सभागृहातील पाठपुराव्यासोबतच संबंधित विभागांच्या बैठका, प्रशासनाशी सातत्याने संवाद, बैठकींचे इतिवृत्त आणि त्यावरील अंमलबजावणीचा आग्रह अशा विविध माध्यमांतून शिक्षण विभागातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असली तरी प्रत्यक्ष निर्णय आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी यालाच खरे महत्त्व असल्याचे आमदार तांबे यांनी अधोरेखित केले.