shikrapur-malthan-road

Video! शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी? लोखंडी गजांच्या वापराबाबतही संशय, नागरिकांचा संताप अनावर…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर (तेजस फडके) : शिक्रापूर ते मलठण या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचा खेळखंडोबा सुरूच असून, रस्ता दुरुस्त होण्याऐवजी दिवसेंदिवस त्याची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. कुठे खडी उखडली आहे, कुठे काँक्रिटचे काम अर्धवट आहे, तर कुठे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याऐवजी संपूर्ण रस्ता उखडून ठेवण्यात आल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिक्रापूर ते मलठण या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, काँक्रिटमध्ये लोखंडी गजांचा पुरेसा वापर केला जात आहे की नाही, याबाबत नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. काँक्रिटचे काम रात्रीच्या वेळी काम केले जात असल्याने आणि लोखंडी गजांचे तुकडे वापरले जात असल्याचा आरोप होत असल्याने या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम पूर्ण होणार तरी कधी आणि ठेकेदार नेमके करतोय काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू असून, अनेक महिने उलटूनही रस्त्याची परिस्थिती सुधारलेली नाही. उलट काही ठिकाणी रस्त्यावरील खडी उखडली असून, वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक, पादचारी आणि परिसरातील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे काम करताना एका बाजूचे काम पूर्ण करून दुसऱ्या बाजूला काम सुरू करण्याऐवजी संपूर्ण रस्ता उखडून ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी काम अर्धवट सोडण्यात आले आहे. काही ठिकाणी काँक्रिटचे काम झालेले आहे, तर काही ठिकाणी अद्याप खडी आणि मातीच दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

काँक्रिटमध्ये लोखंडी गजांचा वापर किती? नागरिकांचा संशय!
शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या कामातील सर्वाधिक गंभीर मुद्दा म्हणजे काँक्रिटच्या कामात लोखंडी गजांचा वापर योग्य प्रमाणात केला जात आहे की नाही, याबाबत नागरिकांनी उपस्थित केलेला संशय. काँक्रिटमध्ये वापरण्यात येणारे लोखंडी गज पूर्ण लांबीचे न वापरता तुकड्यांच्या स्वरूपात वापरले जात असल्याचा आरोप काही नागरिकांकडून केला जात आहे. रात्रीच्या वेळी काम केले जात असल्याने प्रत्यक्ष कामावर देखरेख कोणाची असते, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

रस्त्याच्या कामासाठी मंजूर असलेले साहित्य, लोखंडी गजांचे प्रमाण, काँक्रिटची जाडी आणि वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता यांची तपासणी झाली आहे का? कामाचा दर्जा तपासण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे का? नागरिकांनी व्यक्त केलेल्या संशयाची दखल घेऊन संबंधित विभागाने तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. मात्र, लोखंडी गजांच्या वापराबाबतचे आरोप अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे संबंधित विभागाने कामाचे मोजमाप, गुणवत्ता चाचण्या आणि प्रत्यक्ष वापरलेल्या साहित्याची माहिती सार्वजनिक करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.

अपघातांचे सत्र सुरूच; प्रवाशांच्या जीवाशी खेळ!
शिक्रापूर-मलठण रस्त्यावरील अर्धवट काम, उखडलेली खडी, धूळ आणि उंच-सखल भाग यामुळे या मार्गावर अपघातांचा धोका वाढला आहे. यापूर्वीही या रस्त्यावर अनेक अपघात घडल्याचे नागरिक सांगतात. रात्रीच्या वेळी रस्त्याची अवस्था स्पष्टपणे दिसत नसल्याने वाहनचालकांसाठी हा प्रवास अधिक धोकादायक ठरत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांचे वाहन खडीवरून घसरून पडत आहे. रस्त्यावर योग्य दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्यामुळे अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांना दररोज या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ठेकेदारावर कोणाचा वरदहस्त? अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात!
या कामातील दिरंगाई आणि निकृष्ट दर्जाबाबत यापूर्वीही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. ठेकेदाराला काम वेळेत आणि दर्जेदार करण्यास भाग पाडण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित ठेकेदाराचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्यामुळे ठेकेदाराच्या कामाची निष्पक्ष तपासणी होणे आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई होणे आवश्यक आहे.

सोशल मीडियावर संताप; बातम्यांनंतरही प्रशासनाला जाग येईना!
शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या दुरवस्थेबाबत www.shirurtaluka.com ने बातम्या प्रसिद्ध करून नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडली होती. मात्र, बातम्यांची मालिका प्रसिद्ध होऊनही प्रत्यक्ष परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. सोशल मीडियावरही रस्त्याच्या कामाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रस्ता कधी पूर्ण होणार? कामाचा दर्जा कोण तपासणार? ठेकेदाराला जाब कोण विचारणार? आणि नागरिकांना आणखी किती दिवस धुळीतून प्रवास करावा लागणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

कामाची गुणवत्ता तपासा, दोषींवर कारवाई करा!
शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी. काँक्रिटची जाडी, लोखंडी गजांचा वापर, साहित्याची गुणवत्ता आणि कामाचे तांत्रिक निकष यांची स्वतंत्र तपासणी करावी. कामाच्या ठिकाणचे मोजमाप आणि गुणवत्ता चाचण्यांचे अहवाल सार्वजनिक करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. केवळ रस्ता उखडून काम सुरू असल्याचे दाखविण्यापेक्षा दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता तयार करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या करातून होणाऱ्या या कामात कोणत्याही प्रकारची तडजोड होता कामा नये. आता तरी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी जागे होणार का? की शिक्रापूर-मलठणच्या नागरिकांना आणखी काही महिने धूळ, खडी आणि अपघातांच्या भीतीतच प्रवास करावा लागणार? हा खरा प्रश्न आहे.

Video! शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या कामाचा खेळखंडोबा! निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहनचालक हैराण…

शिक्रापूर-मलठण रस्ता झाला चिखलमय; ठेकेदार कुठंय…

शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम फक्त कागदावरच सुरू आहे काय?

शिक्रापूर-मलठण रस्त्याची अवस्था जशीच्या तशी; ठेकेदाराने धरले वेठीस!

शिक्रापूर-मलठण रस्ता नियोजनाच्या अभावामुळे बनलाय मृत्यूचा सापळा!

शिक्रापूर-मलठण रस्त्याबाबत नागरिकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत