शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहर व तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून अवघ्या महिनाभरात चार दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी दोन घटना शिरूर शहरातील ढोरआळी परिसरात तर एक घटना कवठे येमाई येथे घडली आहे. सतत घडणाऱ्या या चोरींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान शिरूर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
शिरूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांनुसार, ११ते १२मे दरम्यान ढोरआळी येथील अक्का काळे यांच्या रूमसमोरील पार्किंगमधून किरण राजेंद्र मोरे यांची एमएच 12 टी.एफ 1621 क्रमांकाची हिरो कंपनीची काळ्या-पांढऱ्या रंगाची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या दुचाकीची किंमत सुमारे 50 हजार रुपये असून याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View this post on Instagram
त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पुन्हा ढोरआळी परिसरातच दुसरी चोरी झाली. १४ मे रोजी पहाटेच्या सुमारास माळीबाबा गाडीलकर यांच्या भाड्याच्या खोलीसमोर उभी केलेली उदधमपाल प्रेमदत्त चतुर्वेदी यांची एमएच 12 डब्ल्यूजी 5185 क्रमांकाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केली. सुमारे ३० हजार रुपये किमतीच्या या दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच मालिकेतील आणखी एका घटनेत कवठे येमाई येथील निखिल गजानन नेवासकर यांची एमएच 12 आरजे 1594 क्रमांकाची होंडा सीबी युनिकॉर्न मोटारसायकल घरासमोरील मोकळ्या जागेतून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या दुचाकीची किंमत सुमारे ३० हजार रुपये असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व घटनांमध्ये चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरासमोर, पार्किंगमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सर्वच प्रकरणांमध्ये आरोपी अज्ञात असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सीसीटीव्ही आणि गस्त वाढविण्याची मागणी…
शिरूर शहरातील विविध भागांमध्ये तसेच तालुक्यातील गावांमध्ये दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांनी रात्रीची पोलिस गस्त वाढविणे, संशयितांवर लक्ष ठेवणे आणि सीसीटीव्ही यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची मागणी केली आहे. अनेक ठिकाणी दुचाकी मालकांना वाहन सुरक्षित ठिकाणी उभे करण्याबरोबरच अतिरिक्त सुरक्षा लॉकचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
पोलिसांचा तपास सुरू…..
शिरूर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित गुन्ह्यांचा तपास सुरू असून घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुन्हेगारी रेकॉर्डवरील संशयितांची पडताळणी करण्यात येत आहे. चोरीस गेलेल्या दुचाकींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान, महिनाभरात चार दुचाकी चोरीच्या घटनांमुळे शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून चोरट्यांचा लवकरात लवकर पर्दाफाश करण्याची मागणी जोर धरत आहे.
शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भरदिवसा मंगळसूत्र हिसकावले…
शिरूर तालुक्यात डीपी चोरीचे प्रमाण वाढले; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण…
मोटार सायकल चोरी करणाऱ्या शिरूर तालुक्यातील सराईत टोळीस अटक…
शिरूर पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणाचा केला उलगडा, आरोपी गजाआड, सोनेही जप्त…