नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार
शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या मोबाईल व रोख रकमेच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांनी कोरेगाव भीमा येथील आठवडे बाजाराला भेट देत व्यापारी व नागरिकांशी संवाद साधला आणि पोलिसांच्या कडक उपाययोजनांची माहिती दिली.
कोरेगाव भीमा येथील गजबजलेल्या आठवडे बाजारात स्पीकरद्वारे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देताना पोलीस निरीक्षक यादव यांनी परिसरातील बाजारांमध्ये चोरीच्या घटना वाढत असल्याचे सांगितले. यापुढे कोरेगाव भीमा, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील अन्य बाजारांमध्ये अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चोरट्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून साध्या वेशातील विशेष पथके तैनात करण्यात येणार असून, दिवसभर गस्त घालून संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच बाजारातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक पंडित मांजरे यांच्यासह पोलीस कर्मचारी श्रावण गुपचे, संदीप कारंडे, गणेश कुदळे, विकास सरोदे, अमोल दांडगे, अजित इंगवले, विकास बांगर, उमेश जायपत्रे, प्रतीक गायकवाड आणि विकास कारखिले यांनी सक्रिय सहभाग घेतला.
दरम्यान, कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे सरपंच अनिकेत गव्हाणे यांनी बाजारातील वाहतूक नियमन व सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
बाजारातील व्यापारी प्रमिला सोनारे यांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, “आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने व्यापाऱ्यांशी असा थेट संवाद साधला नव्हता. महिला चोरट्यांमुळे व्यापाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. अशा संशयित महिलांची ओळख पटल्यास आम्ही त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ.”
नव्या पोलीस निरीक्षकांच्या या धडाकेबाज उपक्रमामुळे आठवडे बाजारांतील चोरीच्या घटनांवर आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. बाजार परिसरात प्रथमच समाधान आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.