करंदीच्या पाटलांकडून स्वखर्चाने ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): गावातील दुर्घटना पासून बचाव तसेच तातडीची मदत मिळवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर प्रभावशाली ठरत असल्याने अनेक गावामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरु करण्यात आलेली असताना गावामध्ये घडलेल्या अनेक घटनांमध्ये तातडीची मदत मिळत असताना देखील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे बंद असलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा करंदीच्या महिला पोलीस पाटलांनी स्वखर्चाने कार्यन्वित केली आहे.

करंदी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी ग्रामसुरक्षा यंत्रणा बसवण्यात आलेली होती. त्या ग्राम सुरक्षा यंत्रणे मुळे गावात काही दुर्घटना घडल्यास तसेच अपघात घडल्यास गावातील प्रत्येकाच्या मोबाईलवर एकाच वेळी फोन जात असल्याने तातडीची मदत मिळत होती. अनेकदा गावामध्ये लागलेल्या आगी, रात्रीच्या वेळी आलेले चोरटे, शेतकऱ्यांना दिसलेले बिबटे याबाबत वेळीच मदत मिळून अनेक दुर्घटना देखील टळल्या गेलेल्या आहेत. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे दिड वर्षापासून सदर यंत्रणा बंद पडलेली होती. त्यामुळे सदर यंत्रणा सुरु करण्याची मागणी महारुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष राघू नप्ते यांनी ग्रामपंचायतकडे मार्च २०२२ मध्ये केलेली होती.

परंतु ग्रामपंचायत प्रशासन काही केल्या सदर यंत्रणा चालू करुन घेत नसल्याने अखेर करंदीच्या महिला पोलीस पाटील वंदना महेश साबळे यांनी स्वखर्चाने नागरिकांच्या सोयीसाठी सदर यंत्रणा सुरु करुन दिली असल्याने महिला पोलीस पाटलांचे गावातून कौतुक होत आहे तर गावामध्ये सार्वजनिक कामांमध्ये हजारोंची वर्गणी देत आम्ही खूप भारी असे दाखवणारे स्थानिक पुढारी गावाच्या हिताच्या कामातून कोठे गायब झाले असा देखील प्रशन गावातील नागरिकांना पडला आहे.

करंदी गावातील ग्रामसुरक्षा यंत्रणा मागील बॉडीच्या काळात बसवण्यात आलेली असून अनेक महिन्यांपासून बंद पडलेली होती. याबाबत सदर यंत्रणा सुरु करण्याबाबत गावातील राघू नप्ते यांनी अर्ज दिला. परंतु सध्याच्या ग्रामपंचायत बॉडीच्या काही शंका असल्याने यंत्रणा देणाऱ्या लोकांसोबत मिटिंग लावा असे बोलत होते. त्यामुळे त्यांच्याकडून यंत्रणा सुरु करण्याबाबत प्रतिसाद येत नव्हता, असे ग्रामविकास अधिकारी दिलीप पानसरे यांनी सांगितले.