विद्याधाम विद्यालयात प्रवेशोत्सवाचा उत्साहपूर्ण जल्लोष

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई येथील विद्याधाम विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे शिक्षण सहसंचालक हरून आतार यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

विद्यालय परिसर आकर्षक सजावट, स्वागत कमानी आणि रंगीबेरंगी फलकांनी सजला होता. ढोल-ताशांच्या गजरात नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे व नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव सदाशिवराव पुंडे होते. प्राचार्य विनोद शिंदे यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाच्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला. मार्गदर्शन करताना शिक्षण सहसंचालक हरून आतार यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला. गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालयाने सुरू केलेले विशेष उपक्रम समाजाभिमुख व स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस बबनदादा शिंदे, सरपंच बंडू पुंडे व बापूसाहेब ननवरे यांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिक्षणात जिद्द, शिस्त आणि सातत्य राखण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास आशिया तांबोळी, बाळासाहेब पुंडे, पोपटराव तळोले, रमेश खर्डे, अनिल चौधरी, रतन तळोले, दत्तात्रय पुंडे, सुभाष गावडे, दत्तात्रय खोडदे, अल्ताफ तांबोळी, प्रवीण बांदल, चंद्रकांत लोंढे, उमेश रुपनेर, नवनाथ खैरे, परमेश्वर दंडवते यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेच्या अध्यक्षा अंजलीताई घोलप यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच “माझा शाळेतील पहिला दिवस” या सेल्फी पॉईंटने विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले, तर मनोज धुमाळ यांनी आभार मानले.नवीन स्वप्ने, नवी उमेद आणि ज्ञानप्राप्तीच्या नव्या प्रवासाला सुरुवात करून देणारा हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या मनात कायम स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत