मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात हा प्रवेश पार पडला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कॅप्टन अमोल महाडिक यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला देशभरातून पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले. महाडिक यांना प्रोफेशनल काँग्रेस विभागात जबाबदारी देण्यात येणार असून त्यांच्या अनुभवाचा पक्षाला लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना कॅप्टन अमोल महाडिक म्हणाले, “आमचे कुटुंब काँग्रेस विचारांचेच आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने घरी आल्यासारखे वाटत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला असून पक्ष देईल ती जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडेन.”
पत्रकारांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अन्न व औषध प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेचा संदर्भ देत ते म्हणाले, “ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे, तेथील परवाने रद्द केले जात आहेत. त्याचप्रमाणे राज्य सरकारचाही परवाना रद्द करण्याची वेळ आली आहे. हे सरकार राज्यात सर्वत्र घाणेरडे राजकारण करत आहे.”
मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सपकाळ म्हणाले की, सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासने जाहीर करावीत. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने विविध समाजांमध्ये संघर्ष निर्माण केला असून हा प्रश्न सोडवायचा असेल तर जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी मान्य करावी, अशी मागणी त्यांनी केली.