पत्रकारांशी झालेल्या वादाबाबत खासदार संजय पाटील यांची जाहीर माफी

महाराष्ट्र

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जाहीर दिलगिरी व्यक्त करत संपूर्ण माध्यम क्षेत्राची माफी मागितली आहे. वादाच्या प्रसंगी अनवधानाने वापरलेल्या अपशब्दांबद्दल खेद व्यक्त करत त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेवर टीका करण्यास हरकत नसली तरी कुटुंबीयांना आणि दिवंगत वडिलांना राजकारणात ओढू नये, अशी भावनिक विनंती केली.

पत्रकारांशी संवाद साधताना संजय पाटील म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश केल्यापासून त्यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. “आज सकाळी पत्रकार मित्र आले तेव्हा मी त्यांना हात जोडून विनंती केली होती की, या विषयावर मला आता काहीही बोलायचे नाही. मात्र वारंवार तोच प्रश्न विचारण्यात आल्यामुळे वातावरण तापले आणि गडबडीत माझ्याकडून अपशब्द निघाले. त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधू-भगिनींची मनापासून माफी मागतो,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी विरोधकांनाही आवाहन केले. “माझ्या राजकीय भूमिकेवर किंवा माझ्यावर टीका करण्यास माझी कोणतीही हरकत नाही. मात्र माझी पत्नी, मुलगी, आई आणि आज हयात नसलेले माझे वडील यांच्याबाबत खोट्या गोष्टी पसरवणे किंवा अपमानास्पद भाषा वापरणे योग्य नाही. राजकारण माझ्यापुरते मर्यादित ठेवावे आणि कुटुंबाला त्यात ओढू नये,” असे ते म्हणाले.या प्रकरणानंतर संजय पाटील यांनी माध्यमांची जाहीर माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या या भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत