शिंदोडी गावात रात्रीच्या वेळेस दिसली ‘ड्रोन’ सदृश्य वस्तू; संशयास्पद वस्तूमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिंदोडी गावात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस आकाशात ड्रोनसदृश्य वस्तू फिरत असल्याचे दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत आकाशात चमकणारे दिवे आणि सतत फिरणारी ही संशयास्पद वस्तू नेमकी काय आहे, याबाबत गावकऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रात्री ९ ते १२ वाजण्याच्या दरम्यान ही वस्तू गावाच्या परिसरात तसेच शेतजमिनींच्या वरुन फिरताना दिसत आहे. काही नागरिकांनी मोबाईलमध्ये याचे व्हिडिओ चित्रीकरणही केल्याचा दावा केला आहे. मात्र, ही वस्तू अधिकृत ड्रोन आहे की अन्य काही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

विशेष म्हणजे, ग्रामीण भागात रात्रीच्या अंधारात अशा प्रकारे ड्रोन सदृश्य वस्तू फिरत असल्याने शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काहींनी चोरी, रेकी किंवा अन्य बेकायदेशीर हालचालींसाठी ड्रोनचा वापर होत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे.

गावातील काही युवकांनी या वस्तूचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता ती अचानक दिशा बदलून दूर निघून जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या गूढ वस्तूबाबत अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे. गावात याविषयी दिवसभर चर्चा सुरु असून अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी…

शिंदोडी गावचे पोलिस पाटील भास्कर ओव्हाळ यांनी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. रात्रीच्या वेळेस आकाशात फिरणारी ही वस्तू नेमकी कोणाची आहे, ती कोणत्या उद्देशाने वापरली जात आहे आणि तिच्याकडे आवश्यक परवानग्या आहेत का…? याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रात्रीच्या वेळेस बाहेर पडायला वाटते भिती…

“रात्रीच्या अंधारात गावाच्या आणि शेतांच्या वरुन फिरणारी हि ड्रोनसदृश्य वस्तू नेमकी कोणाची…? प्रशासन याचे गूढ उकलून नागरिकांच्या मनातील भीती दूर करणार का…?” सध्या याच प्रश्नाची गावकऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा रंगली असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्व शिंदोडीकरांचे लक्ष लागले आहे.

करडे-कारेगाव रस्त्यावरील विजेचे खांब बनले जाहिरातींचे केंद्र; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

कारेगावच्या यश इन चौकात कचऱ्याचे साम्राज्य; ग्रामपंचायत प्रशासनाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत