नवी दिल्ली: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत खासदार डॉ. ज्योती सावित्री नग्नाथ वाघमारे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे (NCW) अधिकृत तक्रार दाखल केली आहे. राऊत यांच्या गेल्या चार वर्षांतील वादग्रस्त विधानांची दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे.
खासदार वाघमारे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना पाठविलेल्या ईमेल तक्रारीत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला राऊत यांच्या वक्तव्यांमुळे धक्का बसत असल्याचा आरोप केला आहे. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी सभ्य आणि जबाबदार भाषा वापरणे अपेक्षित असताना, वारंवार करण्यात येणाऱ्या कथित आक्षेपार्ह विधानांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
तक्रारीत महिला लोकप्रतिनिधींबाबत कथित अश्लील आणि अपमानास्पद शब्दप्रयोग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच एका महिला कार्यकर्त्याशी कथितरित्या आक्षेपार्ह भाषेत संवाद साधल्याच्या ऑडिओ क्लिप्सचाही उल्लेख करण्यात आला आहे.याशिवाय, पत्रकार परिषदांमध्ये वापरण्यात आलेली कथित आक्रमक आणि हिंसक भाषा, विरोधकांबाबत केलेले वादग्रस्त उल्लेख आणि सार्वजनिक वक्तव्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे.
खासदार वाघमारे यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, उपलब्ध पुराव्यांची चौकशी करावी आणि आवश्यक त्या कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.दरम्यान, या तक्रारीवर संजय राऊत किंवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.