मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर टीका करत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.
ॲड. मातेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, मॅनहोल सुरक्षा आणि पूरनियंत्रणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात पाहणी करणारे अधिकारीच उघड्या मॅनहोलमध्ये पडत असतील, तर मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी कंत्राटदार, अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या संगनमतातून जनतेच्या पैशांचा अपव्यय झाल्याचा आरोप केला. कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवूनही सखल भागांमध्ये दरवर्षी पाणी तुंबत असल्याने कामांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले.
“वर्षानुवर्षे सामान्य मुंबईकर मॅनहोल, खड्डे आणि पाण्यात पडत होते, तेव्हा प्रशासनाला जाग आली नाही. मात्र अधिकारी मॅनहोलमध्ये पडताच संपूर्ण व्यवस्था हादरली. सामान्य नागरिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या जीवाची किंमत वेगवेगळी आहे का?” असा उपरोधिक सवालही ॲड. मातेले यांनी केला.
मुंबईकरांच्या कररूपी पैशांचा नेमका वापर कुठे झाला, याचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे. तसेच नालेसफाईच्या कामांची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.