मुंबई: जागतिक एमएसएमई (MSME) दिनानिमित्त महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) तर्फे शनिवारी (27 जून) वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात ‘महाराष्ट्र MSME परिषद व MSME पुरस्कार 2026’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणाऱ्या या परिषदेत राज्यभरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील सुमारे 2,500 हून अधिक उद्योजक, उद्योगतज्ज्ञ, वित्तीय संस्था, गुंतवणूकदार तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
“संकल्पातून सिद्धीकडे – From Commitment to Achievement” ही यंदाच्या परिषदेची संकल्पना असून निर्यातवृद्धी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल परिवर्तन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत औद्योगिक विकास, वित्तपुरवठा आणि महिला उद्योजकता अशा महत्त्वपूर्ण विषयांवर विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योगांना ‘महाराष्ट्र MSME पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात येणार आहेत.
कारागीर व हस्तकला, नेक्स्टजेन MSME, डिजिटल व AI उत्कृष्टता, सेवा, उत्पादन, हरित उद्योग, महिला उद्योजक, निर्यात आणि चॅम्पियन MSME अशा नऊ श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार असून, चॅम्पियन MSME वगळता इतर सर्व श्रेणींमध्ये ‘एक्सलन्स’ आणि ‘अचिव्हर्स’ या दोन उपश्रेणींमध्ये गौरव करण्यात येणार आहे.
या पुरस्कारांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण, तंत्रज्ञानाभिमुख, निर्यातक्षम आणि प्रगत MSME उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. परिषदेसाठी उद्योजकांना मोफत नोंदणीची सुविधा उपलब्ध असून जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले आहे.