श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 

महाराष्ट्र

पुणे: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी शुक्रवारी श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी व सर्वांगीण विकासासाठी माऊलींच्या चरणी प्रार्थना केली.

दर्शनानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. बैठकीत श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सोयी-सुविधा तसेच संस्थानसमोरील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. या संदर्भातील सविस्तर निवेदनही संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सादर करण्यात आले.

संस्थानने मांडलेल्या मागण्यांवर शासनस्तरावर सकारात्मक विचार करून संबंधित विभागांशी समन्वय साधत योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. श्रीक्षेत्र आळंदी हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील **’दर्शन बारी’**चा गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला विषयही लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

बैठकीला परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर लोंढे, पुरुषोत्तम पाटील, ॲड. रोहिणी पवार, वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत