छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आयोजित ‘एल्गार अन्नदात्याचा’ आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारने फसवी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, सातबारा कोरा होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार निलेश लंके, खासदार कल्याण काळे, खासदार अमर काळे, खासदार बजरंग सोनवणे, राजेश टोपे, अनिल देशमुख, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सुनील भुसारा यांच्यासह पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.
यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, महागाई वाढली आहे आणि शेती करणे परवडेनासे झाले आहे. शेती आणि शेतकरी दोघेही संकटात असताना सरकार मात्र निष्क्रिय आहे. लाडक्या बहिणींसह अन्नदात्यांचाही विश्वासघात करण्यात आला असून, जाहीर केलेली कर्जमाफी लाखो शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार नाही. सरकारला जाग येईपर्यंत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
टीईटी पेपरफुटी प्रकरणावरही सपकाळ यांनी सरकारवर निशाणा साधला. भाजपा सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत ७७ वेळा पेपरफुटी झाल्याचा आरोप करत त्यांनी हा प्रकार ‘व्यापम’पेक्षाही मोठा घोटाळा असल्याचे म्हटले. सरकारची यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली असून विद्यार्थी आणि पालकांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठे आंदोलन सुरू केले असून, या लढ्याला काँग्रेसचा पाठिंबा कायम राहील, असेही सपकाळ यांनी सांगितले.