शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे यमाई (ता. शिरूर) येथील १७ वर्षीय तरुणाला जीवे मारण्याची तसेच हात-पाय तोडण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचा आरोप असून, त्यानंतर भीतीपोटी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तडीपार आरोपीसह तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी समीर शाकीर पठाण (वय १७) यांच्या आई आस्मा शाकीर पठाण (रा. चंदननगर, कवठे यमाई) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ३ जुलै २०२६ रोजी समीर हा मोटारसायकलवरून घरी जात असताना आरोपी योगेश तुकाराम देवकर आणि नवनाथ उर्फ बाबू निलेश बोडरे यांनी जुन्या वादाच्या कारणावरून त्याला रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी उपस्थित असलेल्या अर्चना दादाभाऊ जाधव हिनेही “याला जीवे मारू नका, हात-पाय तोडून आयुष्यभर घरात बसवूया,” असे म्हटल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या धमक्यांमुळे समीर मानसिकदृष्ट्या घाबरला आणि त्यानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर आईच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरूर पोलिसांनी तातडीने कारवाई करून योगेश देवकर आणि नवनाथ बोडरे यांना ५ जुलै रोजी पहाटे अटक केली. त्यानंतर अर्चना जाधव हिलाही सकाळी अटक करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी योगेश देवकर याच्याविरुद्ध दरोडा, चोरी आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये अनेक गुन्हे दाखल असून त्याला यापूर्वी दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. अर्चना जाधव हिच्याविरुद्धही दारूबंदी कायद्यासह अन्य स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर नवनाथ बोडरे याच्याविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत करीत असून, गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी केली आहे.या घटनेमुळे कवठे यमाई परिसरात खळबळ उडाली असून, अल्पवयीनांमधील वैमनस्य आणि धमकीच्या घटनांचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर मृत्यूमागील सर्व बाबी अधिक स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.