करडे-कारेगाव रस्त्यावर मंगल कार्यालयासमोर बेशिस्त पार्किंग, श्रीमंतांच्या लग्नाचा थाट, सामान्य वाहनचालकांना शिक्षा…? 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): करडे-कारेगाव (ता. शिरुर) रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांच्या वेळी चारचाकी वाहनांची बेशिस्त पार्किंग होत असल्याने या मार्गावर वारंवार वाहतुक कोंडी होत आहे. याचा सर्वाधिक फटका रांजणगाव MIDC व परिसरातील कंपन्यांमध्ये कामाला जाणाऱ्या कामगारांना बसत असून, “लग्न मोठ्यांचे, पण त्रास मात्र गरिबांना” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व कामगार व्यक्त करत आहेत.

करडे-कारेगाव हा रस्ता स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच MIDC मध्ये ये-जा करणाऱ्या कामगारांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र या मंगल कार्यालयच्या परिसरात कार्यक्रमांच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेशिस्तपणे चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीचा पुर्णतः बोजवारा उडत आहे. रस्ताच्या दोन्ही बाजूला वाहनांचे अतिक्रमण झाल्याने दुचाकी, चारचाकी तसेच कंपनीच्या बस आणि मालवाहू वाहनांना मार्ग काढणे कठीण होत आहे.

रस्ता आहे की फुकटचे पार्किंग…?

विशेष म्हणजे सकाळ-संध्याकाळ कामगारांच्या ये-जा करण्याच्या वेळेतच जर एखादा लग्न समारंभ असेल तर वाहतुक कोंडी अधिक वाढते. या वेळेत काही कामगारांना कंपनीत पोहोचायचे असते तर काहींना घरी जायचे असते. परंतु या ठिकाणी वाहतुक कोंडी झाल्यास कामगारांना रस्त्यात अडकून पडावे लागते. काहींना उशीर झाल्याने कंपनीत उशीर होतो त्यामुळे काहींना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

लग्नाला खर्च लाखोंचा; पण वाहतुक कोंडीकडे मात्र दुर्लक्ष…?

या मंगल कार्यालयात मोठमोठ्या लग्नसमारंभासाठी लाखोंचा खर्च केला जातो; मात्र पार्किंगची योग्य व्यवस्था न केल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला बेशिस्त पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांमुळे याचा संपुर्ण त्रास येथुन प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिक आणि कामगारांना होत आहे. या ठिकाणी कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था आहे. पण त्या पार्किंगची मर्यादा संपल्यावर मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजुने चारचाकी गाड्या बेशिस्तपणे पार्किंग केल्या जातात.

कठोर उपाययोजना करण्याची गरज…?

करडे-कारेगाव रस्ता हा रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जाणारा मुख्य रस्ता आहे. याच रस्त्यावर हे मंगल कार्यालय असल्यामुळे येथील व्यवस्थापक, वाहतूक विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर बेशिस्तपणे उभी राहणारी वाहने केवळ वाहतूक कोंडी करत नाहीत, तर रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण करतात. त्यामुळे भविष्यात एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर जबाबदार कोण…? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

वाहतुक नियंत्रणासाठी कर्मचाऱ्यांची गरज

कारेगाव-करडे रस्त्यावर असणाऱ्या मंगल कार्यालयातील कार्यक्रमांच्या वेळी वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाने खाजगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि रस्त्यावर बेशिस्त वाहन पार्किंग होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच स्थानिक प्रशासनानेही याबाबत योग्य ती काळजी घ्यावी नाहीतर हा प्रश्न केवळ वाहतूक कोंडी पुरता मर्यादित राहणार नाही तर सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याचा आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न बनेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत